शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ, हीच मोदींची गॅरंटी; शरद पवार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आश्वासन, टीका-टीप्पण्णी करणं या पलिकडे सरकारने काय केलं आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी केला आहे. लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

लोकशाहीला संकटात नेणारा कारभार मोदींकडून सुरू असून यामुळे सर्वसामान्य माणसांचे अधिकार उद्ध्वस्त होतील. त्यामुळे लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत. त्याच मोदींची गॅरंटी देत आहेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहीरात दिली जात आहे. आज ते सांगत आहेत की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी ग‌‌ॅरंटी दिली असा घणाघात शरद पवार यांनी केला.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही पवारांनी भाष्य केले. मविआची बैठक झाली असून पुढील आठवडाभरात आम्ही लोकसभेचे उमेदवार जाहीर करू. तुम्ही त्या उमेदवारांना निवडून द्या, तेव्हाच लोकशाहीचे रक्षण होईल असे आवाहन त्यांनी केले. सत्तेचा गैरवापर भाजप करत आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडत आहे. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल, असेही पवार साहेब म्हणाले.

मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष, राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळ्याचा आरोप मोदींनी केला. पुढे काय झाले? ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे भाजप म्हणजे वाशिंग मशीन झालेले असून आरोप करा आणि त्यांना पक्षप्रवेश देऊन आरोप धुवून काढा, असे सुरू असल्याचा आरोपही पवारांनी केला.