राज्यघटना व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू आहे, शरद पवार यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवी दृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला केला असून त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले आहे.

आश्वी बु. येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर डॉ. सुधीर तांबे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजित तांबे, प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते रावसाहेब मस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण पा. कडू, दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षाताई रुपवते, गणपतराव सांगळे, सुधीर मस्के, अशोकराव गायकवाड, वैशालीताई गायकवाड, सरपंच नामदेव शिंदे, विजय हिंगे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाणी व वीज हे खाते होते. त्यातून त्यांनी धरणांची निर्मिती करण्यासह पाण्यापासून वीजनिर्मिती करून हिंदुस्थानला एक नवी दृष्टी दिली. याचबरोबर कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण करताना उपेक्षित वर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. हाच वारसा घेऊन बाळासाहेब गायकवाड यांनी काम केले असून अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी जन माणसांची कामे केली आहेत. सातत्याने लोकांमध्ये राहण्याबरोबर कधीही कायद्याचा गैरवापर केला नाही. संविधानाने समता दिली असून सध्या भारतीय राज्यघटना व संविधान धोक्यात असल्याने सर्वांनी एकजुटीने समतेचा हा विचार टिकवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.