महिला कुस्तीपटूंचा आक्रोश आधीच ऐकायला हवा होता! कुस्ती महासंघावर उशिरा कारवाई झाल्याची पवार यांची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचा नावलौकिक उंचावणाऱया महिला कुस्तीपटूंचा आक्रोश आधीच ऐकायला हवा होता. त्यांच्यासोबतची वागणूक योग्य नव्हती. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघावर केलेली निलंबनाची कारवाई योग्यच आहे. मात्र, या कारवाईस बराच उशीर झाला, अशी खंत अनेक वर्षे महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी पुण्यातील भीमथडीचे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी राजकारणाबरोबरच राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या संदर्भात घडलेल्या घडामोडींवरदेखील शरद पवार यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय कुस्ती महासंघाची निवडून आलेली नवीन कार्यकारिणी निलंबित केली ते योग्यच झाले. मात्र, त्यांनी अशा प्रकारची कारवाई यापूर्वीच करायला हवी होती. ज्या महिला कुस्तीपटूंनी हिंदुस्थानचा सन्मान वाढवला त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. देशाकडून खेळताना कर्तृत्व गाजवणाऱया महिला खेळाडूंसोबतची वागणूक योग्य नव्हती. त्यांना आंदोलनातून फरफटत ओढत नेल्याचे देशासह अवघ्या क्रीडाविश्वाने बघितल्याने हिंदुस्थानची मोठी नाचक्की झाली आहे, असेही शरद पवार म्हणाले.

बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्ती असलेल्या संजय सिंह यांची राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर नव्या मंडळाने 15 आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची घाईगडबडीत घोषणा केली. यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवीन मंडळाने घाईगडबडीत निर्णय घेतल्याचे कारण देत अध्यक्षांसह संपूर्ण मंडळच निलंबित केले. मात्र, यामागचे खरे कारण हे बृजभूषण सिंह यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडली, तर बजरंग पुनियाने ‘पद्मश्री’ पुरस्कार पंतप्रधानांच्या निवासासमोर रस्त्यावर ठेवला होता. या घडामोडींमुळेच पेंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ‘डब्लूएफआय’ला निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.