
पक्षाशी बंडखोरी करणारे सगळे बंडखोर पराभूत होणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिकच्या भूमीवरून गद्दारांना ललकारले. ‘ना टायर्ड, ना रिटायर्ड हूँ… मैं तो फायर हूँ…’ ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ओळ खणखणीतपणे ऐकवून त्यांनी विरोधकांना चोख उत्तर दिले. चांगल्या प्रकृतीने चांगले काम करायला वय कधी अडथळा आणत नाही, असे सांगत वयाचा उपरोधिकपणे उल्लेख करणाऱ्यांना सणसणीत चपराकही त्यांनी लगावली.
शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. तिथे पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरवेळी नाशिकला आलात तेव्हा छगन भुजबळ सोबत असायचे आज ते नाहीत, तुमच्या भावना काय, असे पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले की, ‘नाशिकला रस्त्यावरून येताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव बघितल्यानंतर आत्मविश्वास वाढला, पण त्यापेक्षा माझी भूमिका सामान्य लोकांच्या चेहऱ्यावर मला पाहायला मिळाली त्याचा मला आनंद झाला.’
सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, पार्श्वभूमी जनतेसमोर मांडण्यासाठी मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर ठिकठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे शरद पवार म्हणाले. चीनचे संकट आले तेव्हा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी आमचे आदर्श यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपवली, तेव्हा त्यांना नाशिककरांनीच बिनविरोध लोकसभेवर पाठवलं होतं. नाशिकला स्वातंत्र्याच्या इतिहासात वेगळे महत्त्व आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक उत्तम मार्गदर्शक या शहरातून उपलब्ध झाले. म्हणूनच आपण या जिल्ह्यापासून नवी सुरुवात करीत असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या मालमत्तेचा बंडखोरांनी आग्रह धरू नये
नाशिकच्या कार्यालयावर अजित पवार गटाने दावा सांगितल्याच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे. या मूळ पक्षाच्या साधनसामग्रीचा बंडखोरांनी आग्रह धरणं योग्य नाही. त्यांना सदसद्विवेकबुद्धी सुचेल आणि या भूमिकेतून ते परावृत्त होतील.
भुजबळांना मीच नाशिकमध्ये सुरक्षित केलं
छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आपणच नाशिकच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून येवला या आपल्या विचारांच्या सुरक्षित मतदारसंघाची त्यांच्यासाठी निवड केली आणि यश आले, असे पवार यांनी सांगितले. इथल्या कार्यकर्त्यांची नाराजी असतानाही नांदगावची जागा आणि नाशिक लोकसभेच्या जागेसाठी त्यांना प्राधान्य दिले, त्यांचे ऐकले, तरी लोकांनी हवं ते केलं, असे भाष्य त्यांनी भुजबळ पिता-पुत्राच्या पराभवावर केले.
आगामी निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही
सत्ताधारी पक्षाइतकाच संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षही महत्त्वाचा आहे, तो लुळा कसा होईल, अशी नीती भाजपची आहे. मात्र, देशात 80 टक्के राज्यांमध्ये भाजप नाही यावरूनच उद्याचे चित्र स्पष्ट होते, असे शरद पवार म्हणाले. आगामी निवडणुकीत लोकसभेत भाजपला बहुमत मिळणार नाही, या ना त्या मार्गाने माणसं, पक्ष फोडायचे, खोके संस्कृतीचा वापर करायचा असाच भाजपचा कार्यक्रम चाललाय, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांनी आपले काम आणखी मजबुतीने करावे, हे ऐक्य देशपातळीवर न्यावे, अशी चर्चा झाली.
नाशिकला येत असताना वरुणराजाने शरद पवार यांचे चांगले स्वागत केले. मात्र नाशिकमध्ये अद्याप चांगला पाऊस झालेला नसल्याचे शेतकऱ्यांकडून त्यांना समजले. त्यावर आम्ही निघाल्यावर जसा बरसलास तसाच संबंध नाशिक जिल्ह्यात, राज्यात पावसाचा शिडकाव कर आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लाव अशी प्रार्थना वरुणराजाकडे केली, असे पवार म्हणाले.
अजितला मी सर्वकाही दिले, सुप्रियाला काय दिले?
सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांनी आपला उत्तराधिकारी निवडल्यामुळे अजित पवारांचे बंड घडले का? असा प्रश्न या मुलाखतीत केला गेला. त्यावर, कौटुंबिक मुद्दय़ावर आपल्याला फार बोलायचे नसून ते आपल्याला आवडतही नाही, असे पवार म्हणाले. सुप्रियाला काय दिले याबाबत तुम्हीच तुलना करा, असे सांगताना शरद पवार म्हणाले की, अजितला मी सर्वकाही दिले. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्रीपद दिले. तीन-चार वेळा उपमुख्यमंत्रीही केले. सुप्रियाला काय दिले? तिला एकही महत्त्वाचे पद दिले नाही.
मला काही पंतप्रधान व्हायचे नाही…
सातत्याने माझ्या वयाचा संदर्भ काढला जातो. मोरारजी देसाई 84 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते हे देशाला माहिती आहे, मात्र मला आता पंतप्रधान व्हायचे नाही किंवा मंत्रीदेखील व्हायचे नाही. मला संघटनेचे काम करायचे आहे. त्यामध्ये वयाचा प्रश्न येत नसल्याचे शरद पवार म्हणाले.
वय झालंय पण गडी काय आहे तू पाहिलंय कुठे?
वय 82 झालं हे खरंय, पण गडी काय आहे तू पाहिलंय कुठे, असा सवाल करत शरद पवार यांनी येवल्याच्या सभेतून अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल. धोरणावर टीका करा, पण वय आणि व्यक्तिगत हल्ला या गोष्टी आम्हाला शिकवल्या नाहीत. मी कायमच यशवंतरावांच्या विचारातून चालत आलोय, असे पवार म्हणाले.
रण में अटल तक खडा हूं… पवार पुन्हा पावसात भिजले !
शरद पवार भरपावसात बंडखोरांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. नाशिकच्या वाटेवर असताना त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत झाले. पाऊस पडत असतानाही गाडीतून उतरून भिजत ते कार्यकर्त्यांना भेटले. त्यामुळे पवारांच्या सातारच्या सभेची आठवण झाली. पवारांचा आजचा पावसात भिजलेला फोटो राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आहे.
‘भाग गए रणछोड सभी,
देख अभी तक खडा हूँ मैं,
ना थका हूं, ना हारा हूं,
रण में अटल तक खडा हूं मैं,’
असे ट्विट फोटोसोबत केले आहे तर ‘तेरे हर एक वार का पलटवार हू…,’ असे आव्हाड यांनी नमूद केले आहे.
मी का निवृत्त व्हायचे?
मी का निवृत्त व्हायचे? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. मी अजून काम करू शकतो. माझ्यात काम करण्याची क्षमता आहे. मी आधी निवृत्त होण्याचे ठरवले होते त्यावेळी संपूर्ण पक्षाने मला निवृत्त होऊ नका, असे सांगितले. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नागरिक रडू लागले. मी निवृत्त व्हायचे नाही, असे त्यांनी मला सांगितले. त्याच लोकभावनेचा मी आदर केला आणि राजीनामा मागे घेतला. मग काहीजण मला आता निवृत्त व्हा? असे का सांगत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. मी लोकांमध्ये जातो, त्यांचे प्रश्न मांडतो, यात चुकीचे काय? मी ज्या पक्षाचा अध्यक्ष आहे, त्या पक्ष संघटनेच्या वाढीसाठी काम करतोय आणि मी कोणत्या वयात थांबले पाहिजे, हे तुम्ही मला का सांगत आहात? मी माझा निर्णय घेऊ शकतो, असेही पवार यांनी बंडखोरांना सुनावले.























































