
मुस्लीम समुदायासाठी हज यात्रा महत्त्वाची आणि पवित्र यात्रा मानली जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून लाखो यात्रेकरू हजला जातात. हज यात्रेकरूंना सरकारकडून अनेक प्रकारच्या सुविधाही दिल्या जातात. यावर्षी हज यात्रेला जाण्यासाठी देशात 22 विमानतळांवर एम्बर्केशन पॉइंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई एम्बर्केशन पॉइंटच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर एम्बर्केशन पॉइंटवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकडून 88 हजार रुपये जास्तीचे आकारले जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यात राहणाऱ्या हज यात्रेकरूंनी याविरोधात आवाज उठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिले आहे. मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरहून हजला जाणाऱ्या यात्रेकरूंकडून समान शुल्क आकारले पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, या वर्षी अल्पसंख्याक मंत्रालयाने हज यात्रेकरुंसाठी देशातील 22 विमानतळांची निवड केली आहे. हज समितीने यात्रेकरुंसाठी एम्बार्केशन पॉइंट म्हणून छत्रपती संभाजीनगरचीही निवड केली आहे. या एम्बार्केशन पॉइंटवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकडून अधिकचं शुल्क आकारले जात आहे, याकडे तुमचे लक्ष वेधू इच्छित आहे. मुंबई एम्बार्केशन पॉइंटच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर एम्बार्केशन पॉइंटवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकडून 88 हजार रुपये जास्तीचे आकारले जात आहेत.
यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील हज यात्रेकरूंनी याविरोधात आवाज उठवला आहे. छत्रपती संभाजीनगर एम्बार्केशन पॉइंटवरून हजला जाण्यासाठी लागणारे शुल्क हे मुंबई एम्बार्केशन पॉइंटच्या शुल्काएवढंच असावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर एम्बार्केशन पॉइंट आणि नागपूर एम्बार्केशन पॉइंटचं शुल्क मुंबई एम्बार्केशन पॉइंटवर लागू केलेल्या शुल्काच्या बरोबरीने आणल्यास मला आनंद होईल, असेही शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.


























































