राज्यात सत्तापरिवर्तन व्हावे ही तरुणांची अपेक्षा! शरद पवारांचे युवा संघर्ष यात्रेत प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे ही तरुणांची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात युवा संघर्ष यात्रेतून झाली हे. पुणे ते नागपूर असा आठशे किलोमीटर अंतराचा प्रवास करणारी ही यात्रा तरुणांना निश्चितच आत्मविश्वास देणारी ठरेल. या यात्रेच्या माध्यमातून सत्तापरिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात निघालेल्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात दसऱयाच्या मुहूर्तावर शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यातून झाली. यावेळी मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, युवा संघर्ष यात्रेची मोहीम मोठी आहे. या यात्रेतून अनेक तरुणांचे प्रश्न सुटणार आहेत. त्यांच्या प्रश्नांना निदान मार्ग मिळणार आहे. यापुढे तरुणांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. तसे केल्यास सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

विधिमंडळ ही लोकशाहीची पंढरी आहे. या विधिमंडळाचे दर्शन व्हावे आणि शेतकऱयांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी जळगाव ते लातूर अशी दिंडी आम्ही काढली होती. ही युवा संघर्ष यात्रा आम्ही काढलेल्या दिंडीपेक्षाही मोठी आहे. त्यामुळे ती निश्चितच परिणामकारक ठरेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. खासदार श्रीनिवास पाटील आणि वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य यावेळी रोहित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

… तर सत्ता गमवावी लागेल

युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरुणांना आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे. या यात्रेपूर्वी कंत्राटी भरतीचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारला तो निर्णय रद्द करावा लागला. लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या यात्रेकडे दुर्लक्ष केले तर सत्ताधाऱयांना सत्ता गमवावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

राज्यामध्ये शिक्षण क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. शाळा सुरू आहेत, पण शाळेत शिक्षक दिसत नाही. शैक्षणिक संस्था चालवणारे काही लोक भरमसाट फी घेतात. त्यासंदर्भात सरकारने विचार करायला हवा.

बेरोजगारांची संख्या वाढतेय, पण भरती होत नाही. शिक्षक आणि प्राध्यापकांची पदे भरली पाहिजेत. एमपीएसीच्या माध्यमातूनच भरती झाली पाहिजे, असे पवार म्हणाले.

गाडय़ांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर कोणत्याही नेत्याला गावात, आपल्या भागात फिरकू देणार नाही, अशी भूमिका अनेक भागातील, गावातील मराठा आंदोलकांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार पुण्यातील कार्यक्रम आटोपून शिवाजीनगर येथील निवासस्थानी जात असताना अलका टॉकीज चौकात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या गाडय़ांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.