गडेकरांनी अध्यक्ष असल्याचे सिद्ध करावे – शरद पोंक्षे

नाटय़ परिषदेचे अध्यक्ष कोण याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असताना तहहयात विश्वस्त शरद पवार आणि शशी प्रभू यांनी अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांना पत्र लिहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे गडेकर यांनी अध्यक्ष म्हणून भूमिका घेत विश्वस्त मंडळातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात पुढील 15 दिवसांत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले आहे. तर दुसरीकडे गडेकर यांनी आधी अध्यक्ष असल्याचे सिद्ध करावे अशी भूमिका प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी घेतली आहे.

नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे आणि प्रसाद कांबळी बहुमत नसल्याने सभा आयोजित करत नसल्याचा आरोप नरेश गडेकर यांनी काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. तसेच पोंक्षे हे न्यासाची व विश्वस्तांची दिशाभूल करत असल्याची टीका केली. याकर उत्तर देताना पोंक्षे म्हणाले, गडेकर हे अध्यक्ष आहेत असे शिक्कामोर्तब धर्मादाय आयुक्तांकडून झालेले नाही. त्यांच्याकडून अध्यक्षबदलाचा अहवाल आल्याशिवाय गडेकर अध्यक्ष म्हणून अधिकृतरीत्या कार्यरत असू शकत नाहीत. कायदेशीर कागदपत्रे जोपर्यंत दाखवत नाहीत तोपर्यंत माझ्या दृष्टीने प्रसाद कांबळी अध्यक्ष आहेत.

नाटय़ परिषदेची स्वत:ची घटना आहे. गडेकर त्याची पायमल्ली करताहेत. सात दिवसांनंतर गडेकरांच्या पत्राला सविस्तर उत्तर देऊन त्यांनी परिषदेची कशी दिशाभूल केली याचा खुलासा करेन, असे पोंक्षे म्हणाले.

लवकर विश्वस्तांसोबत बैठक
हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असताना पवार यांच्या सहीचे पत्र गडेकरांना कसे प्राप्त झाले, याची माहिती नाही. त्यासाठी लवकरच तहहयात विश्वस्तांची वेळ घेऊन बैठक आयोजित करण्यात येईल असे पोंक्षे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या