
नगर जिल्ह्याच्या धर्मादाय उपआयुक्त उषा चव्हाण व सहायक धर्मादाय आयुक्त प्रताप सातव याच्या हस्ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीची महाआरती करून मोहटादेवी गडावरील शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली. उत्सव काळात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेत उपासना केली होती. या काळात अनेक भक्त देवीचे दर्शन घेत असल्याने देवीला दृष्ट लागते असे मानत, ही दृष्ट कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काढली जाते.
दृष्ट काढताना पौरोहित्याकडून मंत्र उच्चारत मीठ मोहऱ्यानी देवीची दृष्ट काढण्याची प्रथा आहे. कोजागिरी पौर्णिमेला देवी भ्रमण करण्यासाठी बाहेर पडते अशी धार्मिक मान्यता असल्याने या दिवशी आटवलेल्या दुधाचा नैवद्य देवीला दाखवला जातो. पौराणिक कथेनुसार कोजागिरी पौर्णिमेला समुद्रमंथनाच्या वेळी देवी प्रकट झाली होती. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा हा सण देवी लक्ष्मीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जागरण करून इंद्र व देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यावेळी ह भ प महंत आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड यांचे कीर्तन झाले. उत्सव काळात 45 लाखाहून अधिक भाविक देवी दर्शनासाठी येणार असे गृहीत धरत देवस्थान अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या मार्गर्शनाखाली विश्वस्त मंडळाने नियोजन केले होते. नवरात्र उत्सव सांगता समारोप प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत मोहटा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले.फोटो ओळी पाथर्डी मोहटा देवीची महाआरती करताना उषा चव्हाण व भाविक महिला उपस्थित होत्या.

























































