शेअर बाजारात कोरोना संकट, गुंतवणूकदारांना तब्बल 3.70 लाख कोटींचा फटका

share-market-fall

देशभरात थैमान घालणाऱया कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराचे प्रचंड मोठे नुकसान केले. सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांना तब्बल 3.70 लाख कोटींचा फटका बसला. सर्व 30 कंपन्यांचे शेअर्स खाली कोसळले. देशभर कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा स्फोट झाल्याने त्याचे तीव्र पडसाद शेअर बाजारावर उमटले आहेत.

मागील व्यापार सत्रात 48,832.03 अंकांवर स्थिरावलेला शेअर बाजार सोमवारी सकाळी 1,469.32 अंकांनी गडगडत 47,362.71 अंकांच्या पातळीवर स्थिरावला. बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी तुफान विक्रीचा सपाटा लावला होता. त्यामुळे भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. यात गुंतवणूकदारांचे 3 लाख 70 हजार 729 कोटींचे नुकसान झाले. देशात कुठल्याही क्षणी कठोर लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता आहे. याच भीतीतून गुंतवणूकदारांनी तुफान विक्री सुरू केली. दुसरीकडे आशियातील भांडवली बाजारात संमिश्र वातावरण दिसून आले.

मुंबई शेअर बाजाराच्या मंचावरील सर्वच्या सर्व 30 शेअर्सची घसरण झाली. यात इंडसइंड बँक, ऍक्सीस बँक, बजाज ऑटो, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका बसला.

आपली प्रतिक्रिया द्या