
इराण, इस्रायल, अमेरिकेच्या युद्धजन्य परिस्थितीची झळ जगभरात बसायला सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजारावर देखील त्याचा परिणाम दिसत आहे.
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होत आहे. आज 9 मार्च रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. जागतिक स्तरावरील अस्थिरतेचे सावट बाजारावर स्पष्टपणे दिसून आले असून, व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 78,918.90 च्या तुलनेत 77,056.75 वर उघडला. त्यानंतर सकाळी 9:30 वाजेपर्यंत तो 2426.30 अंकांनी म्हणजेच 3.07 टक्क्यांनी घसरून 76,492.60 वर पोहोचला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीची स्थितीही अशीच राहिली. निफ्टी 24,450.45 च्या तुलनेत 23,868.05 वर उघडल्यानंतर 732.80 अंकांनी किंवा 3 टक्क्यांनी घसरून 23,717.65 वर आला. या घसरणीमुळे निफ्टीने 24 हजार अंकांचा महत्त्वाचा स्तर ओलांडून खाली झेप घेतली आहे. निफ्टीमधील प्रमुख कंपन्यांमध्ये श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन, एशियन पेंट्स, एल अँड टी आणि अदानी पोर्ट्स या शेअर्सना मोठा फटका बसला असून ते सर्वाधिक तोट्यात आहेत. मात्र, अशा स्थितीतही ओएनजीसी आणि कोल इंडिया यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.
विशेषतः पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होणारे त्याचे परिणाम यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि जागतिक स्तरावरील जोखमीच्या भावनेचा थेट परिणाम बाजारावर होत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. सकाळी 7:30 वाजताच्या संकेतानुसारच निफ्टीमध्ये 3.11 टक्क्यांची मोठी घसरण अपेक्षित होती, जी बाजार उघडताच प्रत्यक्षात उतरली. सध्या सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडींकडे लागले आहे.
























































