
रशियाने युक्रेनसोबत युद्धाची घोषणा केल्याचा परिणाम हिंदुस्थानच्या शेअर मार्केटमध्ये दिसला आहे. बाजार सुरु होताच मार्केटमध्ये लाल निशाण फडकले. सुरुवातीला 1800 अकांची घसरण झाल्यावर काही काळ बाजार स्थिर होता, परंतु दुपारनंतर पुन्हा एकदा सेन्सेक्समध्ये तब्बल 2700 अंकांशी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये तब्बल पावणे पाच टक्क्यांची घसरण झाली असून तो 54 हजार 500 च्या खाली ट्रेड होत आहे.
सेन्सेक्ससह निफ्टी आणि बँक निफ्टीवरही दबाव दिसत आहे. निफ्टीमध्येही पावणे टक्क्यांची घसरण झाली असून तो 800 हून अधिक पॉइंटने गडगडला आहे. तर दुसरीकडे बँक निफ्टीमध्येही 2300 पॉइंटची घसरण झाली असून तो 35 हजार 100 च्या खाली ट्रेड होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Sensex tanks 1,461 pts to 55,770 in early trade, Nifty dives 430 pts to 16,633
— Press Trust of India (@PTI_News) February 24, 2022
कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर पार
दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पार गेल्या आहेत. 2014 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती गणनाला भिडल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे तेल निर्यातीवर प्रभाव पडणार आहे. यामुळे महागाई प्रचंड वाढण्याची चिन्हे आहेत.
पेट्रोल-डिझेल्या दरात बदल नाही
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असल्या तरी देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. सलग 86 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही. राजधानी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर मिळत आहे.




























































