शेअर बाजारात घसरण; निर्देशांक 600 अंकानी पडला

416

जागतिक अर्थव्यवस्थेवर असलेले मंदीचे सावट, जागतिक बाजरापेठेतील घसरण याचा फटका हिंदुस्थानी शेअर बाजारालाही बसला आहे. दुपारी 2 वाजेनंतर निर्देशांक 670 अंकांनी घसरला. दिवसभरातील कामकाज संपले त्यावेळी निर्देशांकाने 642 एवढी घसरण घेत 36,481.09 वर बाजार बंद झाला. तर निफ्टीमध्ये 186 अकांची घसरण होऊन तो 10,817.60 वर बंद झाला.

सौदी अरेबियाच्या अरामको या तेल कंपनीच्या दोन संयंत्रांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच हिंदुस्थानी रुपयात झालेली घसरण, अमेरिकी केंद्रीय बँकेच्या बैठकीपूर्वीची संभ्रमावस्था यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही घसरण सुरू होती.

मंगळवारी दुपारी 1.30 वाजता निर्देशांक 450 अंकांनी घसरून 36, 650 वर पोहचला होता. तर निफ्टी 140 अंकांनी घसरून 10, 870 वर पोहचला होता. बाजार सुरू होताच 100 अंकांची घसरण होऊन 37 हजारापेक्षा खाली आला होता. तर निफ्टी 50 अंकांनी घसरून 10, 950 पर्यंत पोहचला होता. अॅटो आणि बँकिंग क्षेत्राच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बजाज अॅटो, महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुतीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तर अॅक्सिस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक, बजाज फायनान्स या बँकिग शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली. तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी घसरून 71.80 रुपयांवर पोहचला होता. सौदीच्या तेल कंपनीवर झालेल्या हल्ल्यानंतर बाजारात घबराट पसरल्याने मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारने केलेल्या महत्त्वाच्या घोषणांमुळे शेअर बाजाराला उभारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे बाजारात घसरण कायम आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या