Share Market update – शेअर बाजारात तुफान तेजी; निफ्टी 25 हजार पार, सेन्सेक्सही वधारला, नेमकं काय कारण

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. निफ्टी-50 ने 25 हजारांचा टप्पा पार केला असून सेन्सेक्सही 200 अकांनी वधारून 81 हजार 700 वर पोहोचला आहे.

आज बाजार उघडण्याआधीच तेजीचे संकेत मिळाले होते. गिफ्ट निफ्टीमध्ये सकारात्मक वाढ दिसली होती आणि बाजार उघडल्यानंतर याचा प्रभाव दिसला. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टीने एकाचवेळी उसळी घेतल्याने गुंतवणूकदारही खूश झाले. जवळपास सर्वच सेक्टरमध्ये तेजीचा परिणाम दिसला. त्यातल्या त्यात ऑटो सेक्टरमध्ये मोठी वाढ झाली. तसेच अदानी समूहाचे शेअरही चांगलेच वाढल्याचे दिसले.

टॉप गेनर

THEMISMED या शेअरमध्ये आज 20 टक्के वाढ नोंदवण्यात आली, तर CCCL हा शेअर 15 टक्के, SIGACHI हा शेअर 14 टक्के, PUNJABCHEM हा शएअर 12 टक्के, तर ATULAUTO हा शेअर 11 टक्क्यांनी वाढला.

जागतिक बाजारात तेजी

अमेरिकेतली महागाई आणि रोजगाराच्या आकडेवारीनंतर आता फेडरल बँक पुढील बैठकीमध्ये व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारातही तेजी दिसून येत आहे. डाओ जोन्स, नेस्डॅक आणि एस अँड पी 500 विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. हाँगकाँगचा शेअर बाजारही दीड टक्के उसळला आहे. यासह टोकिओ, शांघाय, सिडनी शेअर बाजारही तेजीत आहे. फेडरल बँक .025 बेसिस पॉइंटची कपात करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.