हिंदुस्थानचा ‘इस्लामिक स्टेट’ करायचाय! शर्जील इमामचा धक्कादायक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे तुकडे करण्याची विखारी भाषा करणाऱ्या शर्जील इमाम याने पोलीस कोठडीत धक्कादायक खुलासा केला आहे. हिंदुस्थानचा ‘इस्लामिक स्टेट’ करण्याचा आपला मनसुबा असून आपण केलेल्या भाषणाच्या व्हिडीओत कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. अटकेबद्दल आपल्याला पश्चात्ताप नसल्याचेही त्याने म्हटले आहे.

जेएनयूचा संशोधक विद्यार्थी शर्जील इमाम याने शाहीन बागेत आंदोलकांसमोर भाषण करताना भयंकर गरळ ओकले होते. आसामला देशापासून तोडण्यात यावे यासह देशाचे तुकडे करण्याची जहरी भाषा त्याने वापरली होती. शर्जीलच्या या भाषणावरून देशभरात प्रचंड वादंग उठले. त्यानंतर उत्तर प्रदेशातील जेहानाबाद येथून त्याला अटक करण्यात आली. दिल्ली सत्र न्यायालयाने शर्जीलची पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.

पोलिसांच्या अधिक चौकशीत शर्जील इमाम हा अतिरेकी विचारांचा असल्याचे समोर आले. हिंदुस्थान हा इस्लामिक देश झाला पाहिजे असे आपल्याला वाटते असे त्याने पोलिसांना सांगितले. दोन ठिकाणी आपण केलेल्या भाषणाचे व्हिडीओ व्हायरल झाले त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आली नसल्याचेही शर्जीलने स्पष्ट केले. भडकावू भाषण दिल्याबद्दल अटक झाल्याचा आपल्याला पश्चात्ताप नसल्याचेही त्याने निर्ढावलेपणाने सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

  • शर्जील इमामचे कनेक्शन इस्लामिक युथ फेडरेशन किंवा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी आहे का याचा धांडोळा पोलीस घेत आहेत. शर्जीलच्या भाषणाचे व्हिडीओ पोलिसांनी फोरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. शर्जीलच्या सोशल मीडियावरील अकाऊंटचीही तपासणी करण्यात येत आहे.