
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात मोदी यांनी ‘हिंदुस्थानात सगळे काही ठीक आहे,’ असे विधान केले होते. यावर काँग्रेसने आज जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘देशात महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मग देशात सगळे काही ठीक कसे? असे विधान करून मोदी स्वतःच्या जबाबदारीपासून पळू पाहत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केली आहे.
‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमावर अमेरिका आणि हिंदुस्थानमध्येही टीका केली जात आहे. त्यावर काँग्रेसने आज सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. ‘गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर जकात करही लावला आहे. मोदींच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पेट्रोलचे दर 211 तर डिझेलचे दर 443 टक्क्यांनी वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे सगळय़ाच वस्तूंचे दर वाढत आहेत. मग महागाईला आळा घालण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणत्या उपाययोजना केल्या,’ असा सवाल शर्मिष्ठा यांनी केला.
उत्तर प्रदेश, दिल्ली गुन्हेगारी नगरी बनली!
देशात गुन्हेगारी वाढली आहे. विशेष करून महिलांविरोधातील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली गुन्हेगारांची नगरी बनली आहे. त्यांनी देशाला स्मार्ट सिटी देण्याऐवजी पहिल्यांदा देशात एक सुरक्षित राजधानी मिळवून द्यावी. हे सगळे सुरू असताना मग देशात सगळे ठीक कसे,’ असा सवाल त्यांनी केला
बेकारी 8 टक्क्यांवर पोहोचली!
‘देशाची अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नाही. गेल्या 45 वर्षांत झाली नाही इतकी बेकारी वाढली आहे. बेरोजगारी 8 टक्क्यांवर गेली आहे. आर्थिक विकास दर 5 टक्क्यांवर आला आहे. वाहन क्षेत्र पूर्ण कोलमडले आहे. या क्षेत्रातील 2 लाख 30 जणांच्या नोकऱया गेल्या आहेत. कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे.’
























































