धक्कादायक… चार वर्षांत 13 हजार शेतकऱ्यांनी संपवले जीवन; कर्जाच्या पाशातून सुटका करण्यासाठी मृत्यूला कवटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील बदललेले निसर्गचक्र, कधी अपुरा पाऊस, कधी गारपीट आणि तर कधी पूर, त्यातून डोळ्यासमोर नष्ट झालेले पीक, सरकारी अनुदानातून अपात्र ठरवण्याचे प्रकार, मायक्रो फायनान्स कंपन्या, खासगी सावकाराच्या कर्जाचा बोजा अशा विविध कारणांमुळे शेतकरी पार उद्ध्वस्त होत चालला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद पडल्यामुळे मग मृत्यूला कवटाळण्याचे प्रकार वाढला लागले आहेत. परिणामी राज्यात मागील चार वर्षांत तब्बल 13 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे.

मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या तपशिलातून ही  आकडेवारी पुढे आली आहे. जानेवारी 2022 ते ते जून 2026 या काळात तब्बल 13 हजार  128 शेतकऱ्यांनी जीवन संपवले असून त्यापैकी 8 हजार 145 शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहेत, तर 4 हजार 42 शेतकरी अपात्र ठरविले आहेत. सध्या 941 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. आत्महत्या केलेल्या अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱयांपैकी 7 हजार 850  शेतकऱयांना मदत दिली आहे, तर 295 शेतकऱयांच्या कुटुंबांना मदत मिळालेली नाही.

यंदा जूनअखेर 1 हजार 216 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत अर्जदाराने शेतकरी आत्महत्यांची जिल्हानिहाय माहिती मागितली होती. पण जिल्हानिहाय आकडेवारी देण्यास नकार देण्यात आला.

मायक्रो फायनान्सने घेतलातरुण शेतकऱ्यांचा बळी

शिरूर अनंतपाळ – मायक्रो फायनान्सकडून कर्जाच्या वसुलीसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून नांदेड जिल्ह्यातील चंद्रकांत शिंदे या शेतकऱ्याच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूची घटना अद्याप ताजी असतानाच निलंगा तालुक्यात मायक्रो फायनान्सच्या तगाद्याला वैतागून तरुण शेतकऱयाने सोमवारी गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दत्तात्रय कुंभार (29) असे तरुणाचे नाव असून त्याने मायक्रो फायनान्सकडून कर्ज घेतले होते. सोयाबीनच्या भरवशावर आपण हे कर्ज फेडू अशी त्याला आशा होती. परंतु यंदा पावसाने घात केला. त्यातच मायक्रो फायनान्सने वसुलीच्या नावाखाली अक्षरशः त्याचे जगणे मुश्किल केले. याच वैफल्यातून आज दत्तात्रयने राहत्या घरीच गळफास घेतला. त्याच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.