शीनाच्या हत्येचे गूढ वाढतेच! कथित हत्याकांडानंतर राहुल मुखर्जीने खात्यात जमा केले पैसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हायप्रोफाईल शीना बोराच्या हत्याकांडाचे गूढ वाढतेच आहे. शीनाची 24 एप्रिल 2012 रोजी हत्या झाल्याचे पोलिसांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. तथापि, या तारखेनंतरही राहुल मुखर्जीने शीनाच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. तसेच तिला ई-मेलही पाठवला होता. तशी कबुलीच राहुल मुखर्जीने मंगळवारी सत्र न्यायालयात दिली.

2012 मध्ये घडलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणात पीटर मुखर्जी व त्याची पत्नी इंद्राणी मुखर्जी हे दोघे मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात सध्या विशेष सीबीआय न्यायाधीश एस. पी. नाईक-निंबाळकर यांच्यासमोर इंद्राणीचे वकील रणजित सांगळे हे पीटरचा मुलगा राहुल मुखर्जीची उलटतपासणी घेत आहेत. यातून मंगळवारी नवे खुलासे झाले. पोलीस रेकॉर्डनुसार 24 एप्रिल 2012 रोजी शीनाची हत्या झाली होती. मात्र, 19 जून 2012 रोजी राहुल मुखर्जीने शीनाला ई-मेल केला होता. शीनाच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यात पैसे जमा केले असल्याचा ई-मेल राहुलने पाठवला होता. शीना गायब झाल्यानंतर सात महिने राहुलने शीनाच्या खात्यात पैसे जमा केल्याचे मंगळवारी उघडकीस आले.