
आर्थर रोड तुरुंगात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आपल्यालाही कोरोनाची लागण होऊ नये यासाठी जामीन मागणाऱया शीना बोरा हत्याकांडातील आरोपी संजीव खन्ना याला दिलासा देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला. आर्थर रोड तुरुंगातील कोविड ची स्थिती आटोक्यात असल्याचे स्पष्ट करत न्यायाधीशांनी खन्नाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. शीना बोरा हत्या प्रकरणी ऑगस्ट 2015 साली खन्ना याला अटक करण्यात आली होती कोरोनाच्या भीतीने त्याने सत्र न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर न्यायाधीश जे.सी. जगदाळे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. आर्थर रोड तुरुंगातील कोविडची स्थिती सुदैवाने आटोक्यात आहे. तसेच याचिकाकर्ता हा मूळचा कोलकाता येथील असून तो वांद्रे येथे मित्रासोबत राहायचा. वांद्रय़ांत कोविडचा धोका जास्त आहे त्याच बरोबर आरोपीच्या कोविड तपासणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोपीला जामीन देता येणार नाही असे स्पष्ट करत सत्र न्यायालयाने खन्नाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.





























































