रस्ते खड्ड्यात गेले; अलिबागकरांचा ठिय्या पेझारीत शेकापचे आंदोलन

निसर्गाचे वरदान लाभलेल्या अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने येथील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून त्याचा पर्यटनावर परिणाम होत आहे. खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांविरोधात संतप्त अलिबागकरांनी पेझारी चेकपोस्ट येथे ठिय्या दिला. या रास्ता रोको आंदोलनात शेकडो नागरिकही सहभागी झाले होते. आंदोलकांनी तब्बल दीड तास रस्ता रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रस्त्यांच्या दुरवस्थेकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे विदारक चित्र दिसून येते. याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केले. आंदोलनादरम्यान शेकाप कार्यकर्त्यांनी अलिबाग-वडखळ मार्गासह पेझारी-नागोठणे, पेझारी-शहापूर, पेझारी-जलपाडा एमआयडीसी मार्ग रोखून धरला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दिवाळीपूर्वी खड्डे भरणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पेणच्या अधिकाऱ्यांनी लवकरच अलिबाग-वडखळ मार्गावरील खड्डे दिवाळीपूर्वी भरून मार्ग सुस्थितीत करण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र दिवाळीपूर्वी रस्त्यावरील खड्डे न भरल्यास पुन्हा पेझारी चेकपोस्ट येथे आंदोलन करण्याचा इशारा चित्रलेखा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. या आंदोलनात शेकाप महिला आघाडी राज्य संघटक अॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस अॅड. गौतम पाटील यांच्यासह शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.