जोमाने पुनरागमन करण्यासाठी धवन उत्सुक; एशियन गेम्समध्ये संधी न मिळाल्याने धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आगामी एशियन गेम्स 2023 स्पर्धेत सहभागी होणार असून टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन याला संधी देण्यात आलेली नाही. एशियन गेम्ससाठी संघात निवड न झाल्याने मला धक्का बसला. मात्र एशियन गेम्ससाठी निवड झाली नसली तरी भविष्यात मी जोमाने पुनरागमन करेन, असा विश्वास शिखर धवनने व्यक्त केला.

टीम इंडिया आगामी एशियन गेम्स 2023 स्पर्धेत सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर सोपण्यात आली आहे. प्रथमच टीम इंडिया ऋतुराजच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेला 28 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

एशियन गेम्ससाठी संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र निवड समितीने त्याची निवड केली नाही. यावर शिखरने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवड न झाल्याने आपल्याला धक्का बसल्याची कबुली दिली.

एशियन गेम्ससाठी हिंदुस्थानी संघ – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग.

पुनरागमन करण्यासाठी मी सज्ज
एशियन गेम्समध्ये संधी मिळालेली नसली तरी मी टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. संघात समाविष्ट होण्यासाठी मी मेहनत घेत असून पुनरागमनाची कधीही संधी मिळाली तरी मी सज्ज आहे, असेही धवनने सांगितले.