
‘माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस असूनही मला किती त्रास देणार?’, असा सवाल करत पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱयाने नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांमुळे तसेच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित कातकाडे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे (वय 35, रा. पिंपरी गवळी, ता. पारनेर, जि. नगर) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱयाचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे.
जितेंद्र याच्यावर सुपा पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या पत्नीने दोन गुन्हे दाखल केलेले आहेत. एक गुन्हा 2018 साली दाखल करण्यात आला आहे. त्याच्या बायकोचे व त्याचे सातत्याने वाद होते. तसेच त्या दोघांचे न पटल्यामुळे न्यायालयामध्ये त्यांचा घटस्फोटाचा दावा सध्या सुरू आहे. 7 जानेवारी 2022 रोजी पुन्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. जितेंद्र याने आज नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायंकाळच्या सुमारास रॉकेल घेऊन प्रवेश केला. एका अधिकाऱयाच्या दालनात गेल्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला असलेल्या पोलिसांनी त्याला तत्काळ अटकाव करून बाजूला नेले. ‘हे गुन्हे खोटे असून, स्थानिक पोलीस मला या संदर्भामध्ये त्रास देत आहेत, त्याला मी कंटाळलो आहे’, असे म्हणत त्याने आरडाओरड सुरू केली.
नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जितेंद्रची समजूत काढून त्याला भिंगार पोलिसांच्या हवाली केले. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आल्याचे कातकाडे यांनी सांगितले.




























































