ठाण्यात मिंध्यांचा कुष्ठरोग निधी घोटाळा; बोगस रुग्ण दाखवून कोट्यवधी रुपये लाटले

‘ना खाऊंगा ना खाने दुगाना फेम भाजपशी घरोबा करणाऱ्या मिंध्यांनी ठाण्यात कुष्ठरोग्यांना मिळणाऱ्या निधीवरही डल्ला मारला आहे. बोगस रुग्ण दाखवून मिंध्यांच्या बगलबच्च्यांनी कोट्यवधी रुपये आतापर्यंत लाटले असून या निधी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी माहिती अधिकारांतर्गत हा भंडाफोड केला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची तपास यंत्रणांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाणे महापालिका आयुक्त व पोलिसांकडेही त्यांनी रितसर तक्रार केली असून या कुष्ठरोग निधी घोटाळ्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात मिंध्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

ठाणे पालिकेच्या वतीने दरवर्षी कुष्ठरोग्यांना प्रत्येकी २४ हजार रुपये एवढा निधी औषधोपचारासाठी दिला जातो. पालिकेच्या रेकॉर्डवर ७१५ एवढे लाभार्थी दाखवण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात फक्त १०० ते १५० एवढेच खरे कुष्ठरोगी असून उर्वरित लाभार्थी बोगस असल्याचा पर्दाफाश आरटीआय कार्यकर्ते अजय जेया यांनी केला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश लाभार्थी हे कोपरीतील गांधीनगर या परिसरातील आहेत. तेथे पूर्वी कुष्ठरोग्यांची वसाहत होती. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या कमी झाली आहे. तरीही वर्षानुवर्षे ठाणे महापालिका प्रत्येकी २४ हजार रुपये लाभार्थ्यांना देत आहे. कुष्ठरोग्यांची संख्या कमी असताना कोणतीही पडताळणी न करता बोगस लाभाथ्यर्थ्यांवर कोट्यवधी रुपयांची खैरात का केली जाते, असा सवाल जेया यांनी केला आहे.

गांधीनगर भागात १०० ते १५० खरे कुष्ठरोगी असताना उर्वरित लाभार्थ्यांनी निधी लाटण्यासाठी नरेश म्हस्के यांच्या सांगण्यावरून बोगस प्रमाणपत्रे मिळवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील पालिकेचे अधिकारी अकबर शेख हे म्हस्के यांच्या सूचनेनुसारच संबंधितांना निधीसाठी अर्जाचे वाटप करतात. नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅलेक्स फर्नांडिस ही व्यक्ती बोगस प्रमाणपत्रे बनवून देते. त्यासाठी पैसेही घेतले जातात, असा आरोप जेया यांनी केला आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, राष्ट्रीय आरोग्य विभागाकडे याप्रकरणी ऑनलाइन तक्रार केली आहे.