चार लाखांचा कॉम्प्युटर घेण्यासाठी लावली शिपमेंटला आग; बनावट बिल दाखवून घेतली विमा पॉलिसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Japanese man at hand operating a computer

शिपमेंटला आग लागल्यास त्याची नुकसानभरपाई मिळते या हेतूने पार्सलमध्ये फटाके टाकून आग लावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी तपास करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चार लाखांचा कॉम्प्युटर घेण्यासाठी त्याने ते कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्या मुलाची रवानगी बालगृहात केली आहे. 

 यूटय़ूबवर पाहिला व्हिडीओ

मुलाने काही दिवसांपूर्वी यूटय़ूबवर बँकेच्या पॉलिसीबाबत एक व्हिडीओ पाहिला होता. एखाद्या शिपमेंटला आग लागली किंवा नुकसान झाल्यास इलेक्ट्रिक सामानाची मूळ किंमत आणि 10 टक्के नुकसानभरपाई मिळते. पैसे कमवण्यासाठी त्याने दोन कॉम्प्युटर प्रोसेसर खरेदी केले. बनावट इन्व्हॉइस पाठवून एका विमा कंपनीची पॉलिसी खरेदी केली.

 जोगेश्वरी येथे असलेल्या कुरीअर कंपनीत बुधवारी कंपनीच्या वेअर हाऊस्मध्ये पार्सल वेगळे करत असताना अचानक आग लागली. या आगीची माहिती समजताच जोगेश्वरी पोलीस घटनास्थळी आले. त्या पार्सलची तपासणी केली असता त्यात फटाके आणि एक इलेक्ट्रिक सॉकेट आढळून आले. त्याची गंभीर दखल घेऊन जोगेश्वरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रौफ शेख, जावेद शेख, उपनिरीक्षक मंगेश सुर्वे आदींनी तपास सुरू केला. तपासादरम्यान ते पार्सल कुठून आले होते त्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक सांताक्रुझ येथे पोहचले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. मुलाने यूटय़ूबवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पाहिला होता. घरात कोणी नसताना त्याने व्हिडीओ पाहून इलेक्टिक सर्किट बनवले. ते पार्सल दिल्लीच्या बनावट पत्त्यावर पाठवले. जेणेकरून प्रवासात ते पार्सल फुटल्यास नुकसानभरपाई मिळेल असे त्याला वाटले होते. त्या पैशातून तो चार लाखांचा कॉम्प्युटर आणि एक लाखाचा महागडा फोन घेणार होता. नुकतेच त्या मुलाने बारावीची परीक्षा दिली होती. तो रविवारी होणारी ‘नीट’ची वैद्यकीय परीक्षादेखील देणार होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.