शिराळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या 11 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील तडवळे येथे भरदुपारी घडली आहे. सुफीयान शमशुद्दीन शेख (रा. आनंदगाव, ता. माजलगाव, जि. बीड) असे मृत मुलाचे नाव आहे.

तडवळेच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील अंत्रीच्या शिवारातील कृष्णात शामराव पाटील यांच्या शेतातील उसाला तोड आली होती. यासाठी शमशुद्दीन शेख यासह पाच कुटुंबांतील महिला पुरुष ऊसतोड करत होते. याठिकाणी सुफीयान यासह दोन इतर मुलांना बसविले होते. दुपारी बाराच्या दरम्यान शेजारी ऊसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने संधी साधून सुफीयानवर हल्ला केला. बिबट्या मुलाला घेऊन चालल्याचे पाहून त्याच्या वडिलांनी आरडाओरडा केल्याने ऊसतोड कामगारांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे  बालकाला टाकून बिबट्या पळून गेला. जखमी बालकाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या