
मंदिर बंद असले तरी साईदर्शनासाठी भाविकांची शिर्डीत मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कळसाचे दर्शन तसेच आरतीचा लाभ घेऊन भाविक समाधान मानत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने 17 मार्चपासून शिर्डीचे साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतरही शिर्डीची बाजारपेठ अद्यापि ठप्पच आहे. देशातील ई-पासची अट रद्द झाल्यानंतर साईभक्तांनी शिर्डीत येण्यास सुरुवात केली आहे. राज्यातूनच नव्हे, तर परराज्यातील भाविकसुद्धा कळसाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. साई मंदिर परिसरात आता साईभक्त स्तवन मंजिरीचे वाचन करतात, तर साईंच्या सर्वच आरत्यांच्या वेळी कळसासमोर उभे राहून आरतीतही भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होतात.
सरकारने परवानगी दिल्यास मंदिर प्रशासन सज्ज
राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्यास आवश्यक त्या उपाययोजनेसह साई मंदिर दर्शनासाठी तत्काळ सुरू करण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज आहे. नुकतेच साईबाबा संस्थानच्या शिष्टमंडळाने तिरुपती देवस्थानचा दौरा केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तशा सुविधादेखील निर्माण करण्यात आल्या आहेत.
































































