
>> शिरीष कणेकर
चेतेश्वर पुजारा आपल्या फलंदाजीचं बलस्थान आहे की कच्चा दुवा, हा मला पडलेला प्रश्न आहे. न्यूझीलंडविरुद्ध वाटय़ाला आलेल्या पराभवाचं खापर एकटय़ा पुजारावर फोडण्याचा इथे सुतराम हेतू नाही. कोणी एक खेळाडू संघाच्या पराभवाला एकटा कारणीभूत असू शकत नाही. परंतु संघातील आपलं स्थान समर्थनीय ठरविण्यात पुजारा सात्याने अपेशी ठरतोय ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
त्यातून पुजारा ‘ग्लॅमरस’ म्हटल्या जाणाऱया तिसऱया क्रमांकावर खेळायला येतो. सहसा संघातील सर्वोत्कृष्ट स्ट्रोक प्लेयर त्या जागेवर खेळत असतात. डॉन ब्रॅडमन तर खेळायचाच पण कन्हाय, हार्वे हे तडाखेबंद फलंदाज तिसरा क्रम भूषवून गेलेत. त्या जागेवर ‘स्ट्रोकलेस वंडर’ पुजाराला पाठविण्याची चाल कोणाची? रोहित शर्मा सलामीला गेल्यामुळे व कर्णधार विराट कोहली काही अनुच्चारित कारणांमुळे तिसरा जाण्याचं टाळत असल्यामुळे पुजाराची त्या महत्त्वाच्या जागेसाठी निवड करण्यात आली असावी. पुजारा आल्याबरोबर त्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून असलेल्या अपेक्षाही बदलल्या. आता हिंदुस्थानच्या ‘वन डाऊन’ फलंदाजाचं काम म्हणजे एक बाजू लावून धरणे, विकेट पडू न देणे व संघाच्या स्थिरतेला आधार देणे. भूमिकाच बदलली. पण एक बाजू लावून धरणे व विकेट पडू न देणे म्हणजे एकही रन न काढता षटकांमागून षटकात चेंडू ‘डेड’ बॅटीनं केवळ तटवत राहणं व धावफलकाला जराही तोशीस न देणं हे आपल्या भूमिकेचं पृथःकरण मात्र स्वतः पुजारीचं दिसतंय.
इंग्लडचा ट्रेव्हर बेली अशाच खेळाबद्दल (कु) प्रसिद्ध होता. त्याच्यावर अनेक विनोद रचले गेले. एकदा म्हणे एक प्रेक्षक स्टेडियवर बसला होता व बेली फलंदाजी करीत होता. कमालीचं बोअर होऊन त्याला डुलकी लागली. झोपेत त्याला स्वप्न पडलं की, बेली खेळतोय व तो बघतोय. तो दचकून जागा झाला. बघतो तो समोर खरोखरच बेली खेळत होता. म्हणजे चेंडू तटवीत होता.
हा विनोद पुढेमागे पुजाराच्या नावावरही जाऊ शकतो. बचावात्मक खेळणे म्हणजे एकही धाव न काढणं असं कोणी सांगितलंय? नका ना फिरवू बॅट. तू सेहवाग किंवा पंत नाहीस, होऊ इच्छित नाहीस किंवा होऊ शकत नाहीस; पण म्हणजे चेंडू ‘पुश’ करून एकही धाव काढायची नाही? बॉयकॉट काढायचा ना? स्वतःच्याच पायापाशी चेंडू थोपवणे ही कुठली फलंदाजीची कला? मग धावफलक हलता कोणी ठेवायचा? की धावफलक हलता ठेवायचा ही मूलभूत गरजच आपल्या खेळातून लुप्त झाल्येय?
या मार्गाने बचावात्मक खेळून पुजारा क्वचित मोठी धावसंख्या उभारतो. तेव्हा त्याचं आधीचं कुथणं विसरण्याकडे आपला व संघाचा कल असतो. पण तसं होत नाही. तो नुसताच बॉल्स खातो व बाद होतो. तेव्हा त्याने नेमकं काय साधलं, हा प्रश्न पडतो. परवाच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसननं अशीच धीमी फलंदाजी केली पण नाबाद राहून त्यानं संघाला सामना जिंकून दिला. हा फार मोठा फरक आहे. विल्यमसनच्या खेळात एक धोरण होतं, भूमिका होती, एक प्लॅन होता. पुजाराच्या खेळात यातलं काही आढळलं?
मागे पुजारानं खंत व्यक्त केली होती, ‘मी मर्यादित षटकांच्या व टी-20 सामन्यातही खेळू शकतो, पण मला संधीच दिली जात नाही.’
कोण देईल संधी? अन् का देईल? तुझा कुठला (कूर्मगती) खेळ पाहून हाणामारीच्या क्रिकेटमध्ये तू चमकशील असं निवड समितीला वाटावं? कदाचित तू म्हणतोस त्याप्रमाणे वेगळा खेळ तू करशीलही ,पण तुझी निवड करण्यापूर्वी तुझा हा तथाकथित झंझावाती खेळ पाहायला मिळायला नको का?
आज दमदार फलंदाजीबद्दल लौकिक असणाऱया आपल्या संघात पुजारा अडसर बनून बसलाय. आपल्यालाच उपद्रव देणारा खेळाडू चालवून घेण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. तेव्हा जड मनाने पुजाराच्या हातात नारळ देणं मला तरी क्रमप्राप्त दिसतंय. ‘बी’ संघातून श्रीलंकेत जाणाऱया फलंदाजांपैकी एखादा आजमवायला काय हरकत आहे?’ तूर्तास इंग्लंडविरुद्ध गिलसह मयंक अगरवालला सलामीला येऊ द्या व रोहित शर्माला पुजाराच्या जागी खेळवा. के. एल. राहुल तंदुरुस्त असल्यास तोही एक तगडा पर्याय आहे.




























































