लता 91

>> शिरीष कणेकर

लताला आज फोन करू, उद्या फोन करू असं करत मी महिना काढला. (काळजाजवळच्या परमेश्वरसमान माणसाला अहो-जाहो करायला लावून दूर करू नका हो! प्लीSज. तुने हाय मेरे जख्मे जिगर को छू लिया…) शेवटी मी स्वतःला समोर बसवून स्पष्टच विचारलं, ‘काय चाललंय तुझं? तुला नक्की कशाची भीती वाटत्येय? ती काय खाणार आहे का तुला? यापूर्वी कधी फोन केला नव्हतास? काय बाष्कळपणा चालविलायस? उचल फोन आणि फिरव नंबर. डरपोक साला!’\

मी फोन उचलला आणि लताचा नंबर लावला. दस्तुरखुद्द लतानंच फोन उचलला. स्वतःच फोन घेणारा एक देव आनंद व दुसरी लता मंगेशकर. (बाकीचे बहुतेक सगळे राजेश खन्ना, म्हणजे तो त्याच्या ऑफिसात भेळ खात किंवा टेबलावर ताल धरीत तबला वाजवत असला तरी बाहेर टेलिफोनपाशी बसलेला त्याचा माणूस सांगणार ‘साब मीटिंग में है’ यात काय रुबाब होता त्याला माहीत. त्याची मीटिंग भेळेबरोबर किंवा टेबलाबरोबर असायची.)

‘भीती वाटते तुम्हाला फोन करताना, दीदी…’ मी खरं ते सांगितलं. मग कशाला करतोस, असं लता उलटून बोलणार नाही याची मला खात्री होती. ‘कसली भीती?’ तिनं सहजगत्या विचारलं. याच सहजतेनं ती आयुष्यभर गायली. ‘नया घर’मधलं ‘जा जा जा रे’ ऐकलंय ना? आणि ‘रत्नघर’मधलं सुधीर फडके यांचं ‘ऐसे है सुख सपन हमारे?’ तिला हे अप्रसिद्ध गाणं आठवत नसणार या फाजिल आत्मविश्वासानं तिला विचारलं होतं. ‘आठवतंय का?’ तिनं फोनवरून मला चक्क गाऊनच दाखवलं. माझे दात माझ्या घशात गेले. दात घशात जाण्यात किती आनंद असू शकतो ते मी प्रथमच अनुभवलं. नरेंद्र शर्मांचे संपूर्ण गाणे तिला आजही मुखोद्गत होते. काय या बाईपुढे तुम्ही माहीतगिरीचा टेंभा मिरवणार? तुम्ही तोंडघशी पडणार. मी अनेकदा पडलोय. ‘मालती माधव’ (सुधीर फडके, साल 1951)मधलं ‘बांध प्रीती फुलडोर’ याचा उल्लेख करून आम्ही काडेपेटीसारखी आमची छाती पुढे काढणार आणि लता आम्हाला माहीतच नसलेली ‘मालती माधव’मधली तिची आणखी तीन ‘सोलो’ गाणी आमच्या तोंडावर फेकणार. अन् आम्ही म्हणे जाणकार…

‘भीती म्हणजे त्याचं काय आहे, दीदी…’ मी अडखळत म्हणालो, ‘तुमची असंख्य गाणी माझ्याभोवती फेर धरून नाचत असतात व ज्या कंठातून हा संगीत-खजिना निघालाय. त्याच्या मालकिणीशी आपण बोलतोय या विचारांनी माझ्यावर विलक्षण दडपण येतं. खरं साग्ंातो. तरी एक बरं आहे की मी तुमच्यापेक्षा खूपच चांगलं गातो.’

लता हसत सुटली. क्रोसिननं ताप उतरावा तद्वत माझं टेन्शन झपाटय़ानं उतरत होतं. लता आपलं लतापण अंगाखांद्यावर खेळवत नाही. तुम्हाला त्याचं ओझं होऊ देत नाही. म्हणून तर मी लगेच तिला मला आवडलेला एक विनोद सांगितला.

‘बरं का दीदी-’ मी ऐसपैस स्टार्ट घेतला, ‘एक बाई आपल्या सुनेला म्हणाली, मी गरोदरपणात जे जे खाल्लं ते ते आज माझ्या मुलाला आवडतं.’

‘ते ठीक आहे.’ सून म्हणाली, ‘पण गरोदरपणात तुम्ही सिगारेट व दारू घ्यायला नको होती.’

अपेक्षेप्रमाणे पलीकडून उत्स्फूर्त हसू आलं. अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. मग लता नव्वदीतही इतकी खळखळून व निर्मळ कशी हसू शकते? काय तुमचे ते फालतू विनोद, असला तुच्छतावादी दृष्टिकोन तिला शिवूनही गेलेला नाही.

‘एका गोष्टीची मला खंत आहे-’ ती मला म्हणाली होती, ‘मी दिलीपकुमारसाठी कधी गाऊ शकली नाही.’

‘नायिकांपैकी तुमची कोणाशी मैत्री होती हो?’ मी विचारले. दुसऱया दिवशी ती 91 पूर्ण करणार होती. या वयात स्मृतीचे बारा वाजलेले असतात. (मला मीना शोरीच्या ‘एक थी लडकी’चं नावच आठवत नव्हतं.) लताचं नुसतंच डोकं शाबूत नव्हतं तर तिच्या मेंदूचा व जिभेचा संपर्क तुटलेला नव्हता; साधा लुझही झालेला नव्हता. वाटतं ती आत्ताच फ्रेश होऊन रेकॉर्डिंगला आल्येय व गायला सुरुवात करेल, ‘सपना बन साजन आये.’ ‘नर्गिस आणि मीनाकुमारी-’ लता म्हणाली, ‘नर्गिस जवळच राहायची. मीनाकुमारी लाखमोलाची होती. तिचं काळीज सोन्याचं होतं. वागायला भारी गोड.’

‘पुढल्या पिढीतलं कोणी?’

‘पुढल्या पिढीत आनंदच होता. आताच्या नायिकांकडे बघवत नाही. काय त्यांचे कपडे, नखरे, बोलूच नका.’ लता उसासा सोडून म्हणाली.

‘मधुबालाच्या तोंडची तुमची ‘आयेगा आनेवाला’पासून ‘मोहे पनघट पे’पर्यंत सर्व गाणी गाजली.’

‘हो पण, आमचं पटलं नाही. गैरसमज दूर करण्यासाठी तिनं मला घरी चहाला बोलावलं. तिच्या वडिलांचाही माझी आर्जवं करणारा फोन आला. मी गेले. मला बसवून ठेवून ती ओ. पी. नय्यरशी फोनवर गप्पा मारीत होती. माझा पारा चढत होता. मला बोलावून त्याच्याशी गप्पा मारीत बसण्याचा काय हेतू होता? ती हॉलमध्ये इकडून तिकडे तोऱयात फिरत होती. चेहेरे करीत होती, असा दाखवत होती. मी सणकले. मला काय थोबाड दाखवतेस…?’

मी ऐकताना थरारलो. मधुबाला आम्हा सामान्यांच्या लेखी भूलोकीची अप्सरा होती. तिच्या गुलाबपुष्पासमान मुखकमलाचा उल्लेख ‘थोबाड’ असा करणे केवळ लता मंगेशकरलाच शक्य होतं. मधुबाला रूपगर्विता होती तर लता मंगेशकर जगात एकमेवाद्वितीय होती. तिला काय पडली होती? ‘थोबाड’ दाखविण्यापूर्वी मधुबालानं विचार करायला हवा होता. सामनेवाली साक्षात लता आहे हे मधुबालाला कळायला नको होतं का? त्या दिवशी मधुबालासाठी न गाण्याचा निर्णय लतानं घेतला. काही संगीतकारांचं धाबं दणाणलं. त्यातला एक नौशाद होता. तो लताला म्हणाला, ‘मधुबाला जाऊ दे. तू मला भाऊ

मानतेस ना? मग माझ्यासाठी गा…’

लता व रफी यांचं भांडण त्या काळी गाजलं होतं.

‘काय झालं होतं हो नक्की?’ मी विचारलं. फोन करायला घाबरणाऱया माणसाला हा प्रश्न शोभत नव्हता. माती मऊ लागली म्हणून कोपरानं खणणारी आम्ही आगाऊ माणसं.

‘पार्श्वगायक व गायिकांची आमची एक असोसिएशन होती. त्यात ठरलं की, आम्हाला गाण्याची रॉयल्टी ही मिळायलाच हवी. प्रश्न आघाडीच्या गाणाऱयांचा नव्हताच. त्यांना मुबलक पैसे अगदी रॉयल्टीसकट मिळत होते. छोटय़ामोठय़ा गाणाऱयांचाच सवाल होता. त्यांची रॉयल्टी सर्रास बुडवली जायची. त्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलं. अशा बदनाम संगीतकारांकडे न गाण्याचे ठरले. त्यांना मार्गावर आणण्यासाठी उचललेले हे पाऊल होते. नंतर आम्हाला कळलं की, रफीसाहेब खुशाल या संगीतकारांकडे गात होते. पुढल्या सभेत हा विषय निघाला. रफीसाहेब म्हणाले, ‘अशा मार्गानं संगीतकारांना वेठीस धरणे मला योग्य वाटत नाही. मी गाणार.’

‘शब्दानं शब्द वाढत गेला. रफीसाहेब मुकेशला छद्मीपणे म्हणाले, ‘जाहीर है, आप तो महारानी की साईड लेंगे.’ माझं डोकं गेलं. मी तिडिक येऊन म्हणाले, ‘हाँ, मै हूंही महारानी. लेकिन उससे आपको क्या तकलिफ है?’

‘त्या काळी मी खूपच तापट होते.’ लता म्हणाली, ‘मी तरातरा तिथून निघाले. कॉरिडॉरमध्ये फोन होता. मी घरी जाण्यासाठीही थांबले नाही. मी तिथूनच तिघांना फोन केला – नौशाद, मदन मोहन व शंकर-जयकिशन. जास्ती गाणी त्यांचीच असायची. मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं – ‘यापुढे मी रफीसाहेबांबरोबर द्वंद्वगीत गाणार नाही. तुम्ही माझ्या जागी दुसऱ्या कोणालाही घ्या.’ काय झालं, काय झालं असा ते संगीतकार कल्ला करीत असताना मी फोन बंद केला.’

तीन वर्षे हा दुरावा टिकला. त्यानंतर समेट कसा व कोणाच्या मध्यस्थीनं झाला हे माझं लताला विचारायचं राहून गेलं. घाबरून-घाबरून मी पुन्हा फोन करीन तेव्हा आठवणीनं अवश्य विचारीन. एक तर घाबरायचं, नाहीतर आगाऊपणे बोलायचं.
रफीच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना लता फोनवर मला खोल गेलेल्या आवाजात म्हणाली होती, ‘सूर्य मावळला म्हणू की चंद्र नभीचा हरपला म्हणू…’

अहो, मला दोन-दोन नर्सेस ठेवल्यात. मी माझ्या बेडरूममधून बाहेर पडू शकत नाही. कोणी आत येऊ शकत नाही. माझ्या पायांना हात लावायचीही कोणाला परवानगी नाही. डॉक्टरांनी माझं तासातासांचं वेळापत्रक आखून दिलंय. खाण्यापिण्यावर तर बंधनं आहेतच, पण बोलण्यावरही बंधन आहेत. मला खूप कमी बोलायला सांगितलंय.

माझ्याशी तासभर गप्पा मारल्यावर लता मला तिच्या बोलण्यावर असलेल्या निर्बंधाविषयी सांगत होती. मी लताशी बोलत असताना आमची कामवाली आली. जेवणं उरकून तिला भांडी घासायला द्यायची होती. ती थांबत नसते व परतही येत नसते.
लता व कामवाली या रस्सीखेचेत कामवालीचा विजय झाला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या