हिंदुस्थानी क्रिकेट संभ्रमावस्थेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

आजच्या घडीला विराट कोहली, जसप्रीत बुमराह व महेंद्रसिंग धोनी या तिघांच्याच विश्वचषक संघातील जागा निश्चित आहेत. त्यांच्याखालोखाल महंमद शमी, रोहित शर्मा, केदार जाधव व कुलदीप यादव यांच्या.

आता प्रयोग करायला वेळच नसल्यानं मयांक अगरवाल, के. एल. राहुल, शुभम् गिल यांच्यावर ‘रिस्क’ घेण्यापेक्षा आहे त्या शिखर धवनवर विश्वास टाकायचा व त्याला सुबुद्धी होईल अशी आशा करायची. स्क्वेअरकट जमिनीवर ठेवता येत नसेल तर मारायचीच नाही हे मूलभूत तत्त्वज्ञान धवनच्या कानात कोण सांगणार आहे? उचलून मारलेला प्रत्येक चेंडू सीमारेषेपार जाईलच याची गॅरंटी नसते व तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावू शकतो हे रोहित शर्माच्या कानात कोण सांगणार? मला वाटतं, धवन आणि शर्मा डावाची सुरुवात करायला एकत्र बाहेर पडतात तेव्हा चालता चालता त्यांनी एकमेकांच्या कानात फुसफुसायला काय हरकत आहे? अशा रीतीनं बाद होऊन परतताना शर्मा मान का हलवीत असतो हे मला समजू शकलेलं नाही. धवन परतीचा रस्ता धरतो तेव्हा पॉइंटला क्षेत्ररक्षक-तोही मॅक्सवेलसारखा-कुठून आला, असे गोंधळलेले भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात. सामन्यांमागून सामन्यांत आपण हे वैतागवाडी दृश्य पाहतो. आपल्याबरोबरच फलंदाजीचा प्रशिक्षक संजय बांगरही ते निराशपणे बघत असतो. धवन व शर्मा यांच्या फलंदाजीतील शत्रूपक्षानं अचूक हेरलेले हे दोष दूर करणं एवढं अवघड आहे का? ऑस्ट्रेलियात दोन-चार वेळा उजव्या यष्टीबाहेरील चेंडूवर विकेट गमावल्यावर सचिन तेंडुलकरनं पुढल्या सामन्यात संयमानं व निर्धारानं उजव्या यष्टीबाहेरील चेंडूशी एकदाही छेडछाड केली नाही व द्विशतक झळकवले. मॅकग्राला विचारा. हा संयम व निर्धार बाजारात कुठं विकत मिळतो…?

कालपरवापर्यंत आपण विश्वचषक जिंकल्यात जमा आहे, आता फक्त इंग्लंडला जायचं व चषक घेऊन यायचा असा सर्व संबंधितांचा (यात रवी शास्त्र्ााr आलाच) आविर्भाव होता. त्यांनाही दोष देता येणार नाही. आपल्या संघाची अभूतपूर्व विजयी घोडदौड चालू होती. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड आपण पादाक्रांत केले होते. संघ व संघ व्यवस्थापन आत्मविश्वासानं रटरटत होते. विराट कोहलीही म्हणत होता की, फक्त चौथ्या नंबरच्या फलंदाजाचा प्रश्न बाकी आहे. तोही अंबाती रायुडूनं सोडवलाय अशी त्याची धारणा होती. त्यानंतर आपल्याच भूमीवर ऑस्ट्रेलियानं आपल्याला लागोपाठ तीन सामन्यांत चारीमुंडय़ा चीत केलं. एकाएकी तंबूत घबराट पसरली. सुटल्यासारखी वाटणारी गणितं चुकू लागली. लागोपाठ तीन अपयशानंतर रायुडूनं संघातील स्थान गमावले.

आता संघातील चार नंबरच्या स्थानाचा प्रश्न सुटलाय असं कोहली, रायुडू व आपणही म्हणू शकणार नाही. विश्वचषकापूर्वीच्या अखेरच्या एकदिवसीय मालिकेत प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न निर्माण झालेत व त्यांची समाधानकारक उत्तरे कुठे मिळवायची हे कळेनासे झालंय. धोनीला कारकीर्दीच्या या स्टेजच्या, निवृत्तीच्या उंबरठय़ावर असताना पाचव्या क्रमांकावर यावे लागतेय, कारण तिथं आपल्याला भक्कम पर्याय उपलब्ध होऊ शकलेला नाही. कोहलीनंतरची फलंदाजी ठिसूळ, धुरकट व बेभरवशाची वाटत असेल तर तो निवड समितीचा व संघव्यवस्थानाचा दोष म्हणावा लागेल. मयांक अगरवाल, श्रेयस अय्यर, अंकित बावणे यांना कुठेच का खेळवण्यात आले नाही? आहेत त्या खेळाडूंपेक्षा ही मंडळी अधिक चांगली आहेत असे इथे मुळीच सुचवायचे नाही, पण निदान पर्याय मिळू शकला असता. आता तिसरा सलामीवीर राहुलला काय पर्याय संघात असणार आहे? राहुलचे ‘टॅलंट’ वादातीत आहे, पण ते कधीतरी मैदानावर दिसायला नको का? राहुलइतकी अमाप संधी यापूर्वी कोणत्या खेळाडूला दिली गेली होती? विक्रम राठोडला? प्रवीण आमरेला? होशी अमरोलीवालाचा तर कधी विचारही झाला नाही. असं का?

भावी जगज्जेता या पदावरून आपण पायउतार होतोय अशी टोकाची भूमिका घ्यायचे कारण नाही. आपलं सगळंच बिनसलंय असं वाटून घेऊन नर्व्हस होण्याचं कारण नाही. याच संघानं आपल्याला सामने व मालिका जिगरबाज खेळ करून जिंकून दिले होते हे विसरू नका. एकाएकी त्यांची गुणवत्ता त्यांना सोडून गेल्येय असं मानण्याचं कारण नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानं आपल्याला जागं केलंय. उत्तरीय सुटल्यासारखं सैरभर व्हायची गरज नाही. संघातील बहुसंख्य खेळाडू कुचकामी आहेत व संघाबाहेर आहेत ते गुणांचे पुतळे आहेत अशी अतिरेकी भूमिका घेतली जाऊ नये. अखेरच्या सामन्यात बुमराहला विकेट मिळाली नाही म्हणून काय तुम्ही त्याच्या जागी सिद्धार्थ कौलला घेणार आहात की काय?

अष्टपैलू क्रिकेटपटूचं दुर्भिक्ष जाणवतंय. हार्दिक पंडय़ाच्या ‘फिट’ होण्यावर बरंच अवलंबून आहे. त्याचा भाऊ कृणाल गोलंदाजी व फलंदाजी दोन्हींत कमी पडतो. जडेजा असामान्य क्षेत्ररक्षक आहे. तो गोलंदाजीही ‘पकडून’ टाकतो, पण तो फलंदाजीच विसरून गेलाय. विकेटस् पडायला लागल्या की ‘अजून जडेजा यायचाय’ असं नुसतं म्हणायचं. तो येऊन काहीच करत नाही. विजय शंकर तीन-चार षटके फार तर टाकू शकतो. नंतर त्याला धोपटतात. जाधव केवळ ‘सरप्राइझ एलिमेंट’ आहे. अश्विन कामी येऊ शकेल का? पण तुम्ही अलीकडे त्याला कुठे अजमावलंच नाहीत तर विश्वचषकाच्या रिंगणात कसे खेळवणार?

आपली फलंदाजी म्हणजे विराट कोहली हे जे समीकरण बनलंय व जगानं बनवलंय ते घातक आहे. विश्वचषकात ते आपल्या मुळावर येऊ शकतं

[email protected]