शिरोळ तालुक्यात संततधार, पंचगंगेसह कृष्णा, वारणा नद्यांचा पातळीत वाढ

शिरोळ तालुक्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील पंचगंगेसह, कृष्णा, वारणा, दुधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात नऊ फुटाने वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. दरम्यान श्रीक्षेत्र नरसिंह वाडी येथील मंदिरात यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा शुक्रवारी पहाटे झाला.

वाढलेल्या पातळीमुळे नदीकाठी असलेल्या कुरणात पाणी शिरले असून शेतकरी वर्गाची मोटरी काढण्यासाठी व गवत कापणीसाठी धांदल उडाली आहे. तर काही ठिकाणी जलपर्णीखाली विद्युत मोटरी गेल्या आहेत. कृष्णा नदीपेक्षा पंचगंगा नदीच्या पाण्याला जास्त प्रवाह आहे. तर दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दत्तवाड-एकसंबा, दतवाड-मलिकवाड व घोसरवाड-सदलगा हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी

प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी नृसिंहवाडी येथे भेट देऊन पाणी पातळीची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पडणारा पाऊस त्यामुळे नागरिकांनी जागरुक राहण्याबाबतच्या सुचना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या