स्वित्झर्लंडमध्ये यंदा प्रथमच ‘शिवाजी महाराज की जय’चा जयघोष, लेझीमच्या गजरात शिवजयंती उत्सवाची सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वित्झर्लंडमध्ये यंदा प्रथमच ‘शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष घुमला. निमित्त होते शिवजयंती सोहळय़ाचे. येथील शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवाराच्या वतीने स्वित्झर्लंडमध्ये शिवजयंती सोहळा पार पडला.

मोठय़ा उत्साहात लेझीमच्या गजरात स्वित्झर्लंडमधील स्थानिक कलाकारांनी या उत्सवाची सुरुवात केली. भाग्यश्री जाधव, स्मिता शिर्के, प्राजक्ता पाटील, धनंजय पाटील, शेखर सालेम, ओंकार खंडोलकर आणि दानियल हुबर यांच्या तालबद्ध लेझीमचा आनंद सर्व उपस्थितांनी घेतला. सभागृहात ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात प्रिया आपटे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना केली.

संध्या कुलकर्णी आणि नेहा छत्रे यांनी खरी जिजामाता आणि आधुनिक काळातील जिजामाता म्हणून मनोगत व्यक्त केले. त्याचे लेखन संध्या कुलकर्णी यांनी केले होते. चारुदत्त दिवाण, अभिनव बालकृष्णन यांनी भाषणातून शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती सर्वांना रंजक पद्धतीने दिली. सोमदिपा भाकट यांनी श्रीमान योगी हे नृत्य नाटय़ाचे भरतनाटय़म या नृत्यशैलीमध्ये अप्रतिम सादरीकरण केले. कार्यक्रमाची सांगता धनंजय पाटील आणि त्यांचे सुपुत्र आरूष पाटील यांच्या जोरदार पोवाडय़ाने झाली.