16 तारखेला गुलाल आपलाच असेल, शिवतीर्थावर कार्यकर्त्यांचा जल्लोष

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा दादरमधील शिवतीर्थावर होत आहे. या सभेसाठी असंख्य कार्यकर्ते, शिवसैनिक व मनसैनिक वाजत गाजत शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. मुंबई आपल्या साहेबांची…. नाही कुणाच्या बापाची, ठाकरे ब्रँड, जय भवानी जय शिवाजी, उद्धव ठाकरे राज ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणांनी शिवतीर्थाचा परिसर दणाणून निघाला आहे.

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिवतीर्थावर होणारी ही पहिलीच सभा असल्याने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवशक्ती सैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. मुंबईत ठाकरेच पाहिजे अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे, विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची बोलताना जमलेले मराठी बांधव अशा शब्दांत भावना व्यक्त करत आहेत. 16 तारखेला गुलाल आपलाच असणार असा विश्वास या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

दिव्यांग शिवसैनिकाला अश्रू अनावर

या सभेसाठी वरळीवरून एक दिव्यांग शिवसैनिक आले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक असलेल्या या शिवसैनिकाला आज उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले आहेत.