
अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने झालेल्या अपहारामुळे शहरातील विकासकामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. स्ट्रीटलाइटमधील भ्रष्टाचार, 100 कोटी खर्च करूनही रस्त्यांची झालेली वाताहत, गांधी मैदानासह इतरही मैदाने, बागांची झालेली दुरवस्था, काम न करता ठेकेदाराने 85 लाखांचे उचललेले बिल यावरून सुरू असलेला कारवाईचा फार्स यासंदर्भात लेखी स्वरूपातील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रिक्षा आणि दुचाकींवरून आलेल्या शिवसैनिकांकडून महापालिकेला घेराव घालण्यात आला.
गांधी मैदान येथून शहराच्या प्रमुख मार्गावरून शेकडो रिक्षा, तसेच दुचाकीस्वार शिवसैनिकांनी महापालिकेला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली. भ्रष्टाचारावरून आसूड ओढणारे फलकसुद्धा यावेळी लक्ष वेधून घेत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.