इतर इतिहासासाठी भांडताहेत, आपण नव्या पिढीच्या भविष्यासाठी भांडूया!

अंगावर गुन्हे घेऊन, पोलिसांच्या लाठय़ाकाठय़ा झेलून आणि प्रसंगी तुरुंगवास भोगून लोकाधिकारच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मराठी माणसाला सरकारी नोकरीतला हक्क मिळवून दिला. आज प्रत्येक राजकीय पक्ष इतिहासावर भांडतोय, शिवसेना म्हणून आपण नव्या पिढीच्या भविष्यासाठी भांडूया. हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले.

प्रत्येक क्षेत्र अद्ययावत होतेय. नवनवे बदल होत आहेत. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट जीपीटीचा जमाना आहे. करीअरच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. त्याचे योग्य आणि अचूक मार्गदर्शन नव्या पिढीला व्हावे म्हणून लोकाधिकार महासंघाने जिह्याजिह्यांमध्ये परिसंवाद घ्यावेत अशा सूचनाही आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

 

देशात निर्गुंतवणूक होतेय आणि त्या कंपन्या मोदी सरकारचे मित्र कमी किमतीत विकत घेत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग बाहेरच्या राज्यांमध्ये विशेषतः गुजरातमध्ये जात आहेत, पण तिथे गेल्यानंतरही ते चालू झालेले नाहीत असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी यावेळी वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर कंपनीचे उदाहरणही दिले. यापुढे प्रत्येक उपकरणात, साहित्यामध्ये सेमीकंडक्टरचा वापर होणार आहे. त्यामुळे तो उद्योग महाराष्ट्रात यावा यासाठी आपण प्रयत्न केले, पण तो गुजरातला पळवला गेला. हे सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने हेच खरे भवितव्य असणार असल्याने लोकाधिकारने या क्षेत्रात पुढील पाच वर्षांत काय घडेल याचा वेध घेऊन नव्या पिढीला मार्गदर्शन करावे असे आदित्य ठाकरे म्हणाले. गल्ली ते दिल्लीपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचा विकास करणाऱयांनाच निवडून देऊ, असा निर्धार करूया असेही आदित्य ठाकरे म्हणाले.