द्या आमदारकीचा राजीनामा, मी ठाण्यातून लढायला तयार! बघू कोण जिंकतं ते!!

विस्तार होणार, विस्तार होणार असं सांगितलं जातंय. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं विमान दिल्लीला जातं; पण विस्ताराचं नाव घेतलं जात नाही. मंत्री बनविण्याची फक्त गाजरं देऊन ठेवली आहेत. विस्तार होणारच नाही हे लिहून घ्या. विस्तार होण्यासाठी जो काही काळ लागतो तो या सरकारकडे नाही.

‘मुख्यमंत्री माझ्या चॅलेंजला घाबरले आहेत. भाजपच्या आयटी सेलला हाताशी धरून माझ्या बदनामीची मोहीम त्यांनी उघडली आहे. आता मी त्यांना दुसरं चॅलेंज देतो. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. मी ठाण्यात त्यांच्यासमोर लढायला तयार आहे. बघू कोण जिंकतं… एकदा होऊनच जाऊ द्या’, असे खुले आव्हान आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

  शिवसंवाद यात्रेनिमित्त सोमवारी नाशिकरोड भागात आयोजित जाहीर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, काल, परवा मी मुख्यमंत्र्यांना एक आव्हान दिले. तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुमच्यासोबत एवढी मोठी महाशक्ती आहे. माझ्या हातात राज्य, केंद्र सरकार नाही. मुंबई महापालिका नाही. हातात पोलीस नाही की कुठलीच यंत्रणा नाही. मी तुमच्यावर धाड टाकू शकत नाही. तुम्हाला आत टाकू शकत नाही. मी धमकीचा पह्नही करणार नाही. मी साधा आमदार आहे. आपण दोघेही आमदारकीचा राजीनामा देऊ. तुम्ही माझ्यासमोर वरळीत उभं राहून दाखवा, एवढं साधं आव्हान मी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. ते स्वीकारण्याची त्यांची हिम्मत झाली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. घाबरल्यामुळे त्यांनी देशभर भाजपाच्या आयटी सेलला सांगून मला शिव्या देण्याची मोहीम उघडली. मला शिव्यांचं टॉनिक मिळतंय, आनंद वाटतोय. मी आयुष्यात शिवी दिली नाही, देणार नाही. असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या आई, वडिलांचे रक्त माझ्यात आहे. या रक्ताने जात, पात, धर्म भेद करणे कधी शिकवले नाही. पैसा येतो, जातो. नाव गेलं तर परत येत नाही, ते जपलं पाहिजे, ही शिकवण मला आजोबा-पणजोबांपासून आहे. मी नाव जपत शिवसेनेला पुढे घेऊन चाललोय, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे अल्पायुषी सरकार!

जे सरकारमध्ये बसलेत ते स्वतःसाठी रोजगार शोधत आहेत. स्वतःसाठी दिल्लीत जातात. स्वतःसाठी सुरतेला जातात. स्वतःसाठी गुवाहाटीला जातात. झाडे, डोंगर बघून येतात; पण लोकांसाठी काही मागितलेले तुम्ही ऐकलेय का? महाराष्ट्रातले सरकार हे घटनाबाह्य असून हे अल्पायुषी सरकार पडणार म्हणजे पडणारच हे तुम्ही लिहून घ्या, अशा शब्दांत  आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

 शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्याला नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सोमवारी सुरुवात झाली. वंजारवाडी, नाणेगाव, लहवीत, नांदुर, माळेगाव, पळसे यासह ठिकठिकाणी त्यांचे शिवसैनिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. मुंढेगाव आणि पळसे येथे आदित्य ठाकरे यांनी नागरिकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही सहभागी झाले आहेत. सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर, सुनील बागुल आदी हजर होते.

एक नक्की, हिला दिया!

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभेतून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. याबाबत माध्यमांनी विचारले  असता आदित्य ठाकरे म्हणाले. ‘माझ्या वक्तव्यावरुन बरीच चर्चा झाली. सोशल मीडियावरदेखील हाच विषय होता. एक नक्की, हिला दिया! एवढय़ा सर्व लोकांना पुढे करण्याऐवजी त्यांनी स्वतŠच सांगितले असते की, लढायची हिंमत नाही तरी चालले असते. त्यासाठी भाजपला आणि त्यांच्या सोशल मीडियाला सक्रिय करण्याची काय गरज होती, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यातील सध्याचं चित्र हे तात्पुरतं असलं तरी भयानक आहे. यांना एकसुद्धा महिला आमदार मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी मिळू शकली नाही. महिलांवरील अत्याचार वाढतोय, शेतकरी आत्महत्या करतायेत, महागाई, बेरोजगारी वाढतेय. या परिस्थितीत या मंत्रिमंडळात जनतेचा आवाज ऐकणारा एकही मंत्री नाही. मंत्र्यांचे एकमेकांत भांडणं चालले आहेत. हे खातं माझं की ते खातं तुझं, तू खातो की, मी खाऊ, तुम्ही ओके की मी ओके… असं सर्व चित्र असल्याची टीका त्यांनी केली.

शिवसंवाद यात्रा आज चांदोरी, विंचूर, नांदगावमध्ये

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा मंगळवारी, 7 फेब्रुवारी रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होणार आहे. सकाळी 11 वाजता निफाड तालुक्यातील चांदोरी येथील बाजार पटांगणावर आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी एक वाजता विंचूरच्या निसर्ग लॉन्स येथे, तर दुपारी साडेतीन वाजता नांदगावच्या जैन धर्मशाळा येथे ते शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे राज्य मागे जातेय

मुख्यमंत्री दावोसला गेले. त्यासाठी चाळीस कोटी खर्च झाला. पण, उद्योग किती आणले हे ते सांगू शकत नाहीत. अतिवृष्टी, गारपिटीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. बेरोजगारी, महागाई, महिलांवरील अत्याचार वाढत आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे सरकार जनतेचा आवाजच ऐकत नाही. विकासाच्या फक्त घोषणा होत आहेत, प्रत्यक्ष काम होत नाही. पन्नास खोके अन् एकदम ओके हेच सर्वत्र ऐकायला मिळतेय. या सरकारचे फक्त खोके आणि ओके एवढेच सुरू आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे राज्य मागे जात आहे, असे टीकास्त्र्ा आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर सोडले.

ठाणे शिवसेनेचेच राहणार

वरळीत लढण्याच्या आव्हानानंतर तुम्ही केंद्रीय नेत्यांपासून गल्लीतल्या नेत्यांपर्यंत मला शिव्या देण्यासाठी कामाला लावले. सर्व ठिकाणाहून आव्हानं येतायेत, इथे उभे राहा, तिथे उभे राहा. पण, मुख्यमंत्री स्वतः बोलत नाहीत, उत्तर देत नाहीत. असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले की, याचा अर्थ मी असा घेतो की माझ्या आव्हानाला ते घाबरलेत. आता त्यांना एकच सांगतो, एवढं आयटी सेल चालवण्यापेक्षा, एवढय़ा लोकांना बोलावण्यापेक्षा, हे आव्हान परवडणार नाही, मी वरळीतून लढू शकणार नाही, असं मला पह्न करून सांगितलं असतं तरी चाललं असतं. आता मी तुम्हाला दुसरं आव्हान देतोय. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाचा, आमदारकीचा राजीनामा द्या. ठाण्यात मी तुमच्यासमोर लढायला येतो. चला होऊन जाऊ द्या एकदाचं. बघू महाराष्ट्रात काय होतंय ते. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो शिवसेनेचाच राहणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

सरकार पडणारच!

महाराष्ट्रातले सरकार हे घटनाबाह्य असून हे अल्पायुषी सरकार पडणार म्हणजे पडणारच हे तुम्ही लिहून घ्या, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.