
मी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याच्या पुडय़ा सोडण्यात आल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून मी माझे म्हणणे त्यांच्यासमोर मांडणार आहे. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना बंधनकारक असेल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दिवसभर सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती, त्यावर सत्तार यांनीच सायंकाळी खुलासा करत ही चर्चा फेटाळून लावली. माझा सर्व कंट्रोल हा ‘मातोश्री’वर आहे. मी तिथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. माझ्याबद्दल कोण काय बोलले, काय नाही बोलले याची पूर्ण माहिती त्यांना देईन, असे सत्तार म्हणाले.
सत्तार गद्दार, पवित्र ‘मातोश्री’ची पायरी चढू देऊ नका!
जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांना ‘मातोश्री’ची पायरी चढू देऊ नका, असा संतप्त इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला. या निवडणुकीत झालेल्या दगाबाजीची माहिती आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार असून गद्दारांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपची मदत घेऊन गद्दारी केल्याचा स्पष्ट आरोप केला. आघाडीमध्ये अध्यक्षपद काँग्रेसला सुटले असतानाही त्यांनी पक्षनिर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली. अशा गद्दारांना ‘मातोश्री’ची पायरी चढू देऊ नका अशा संतप्त भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
ऍड. देवयानी डोणगावकर यांना पक्षाने उमेदवारी दिली. निवडून आणले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही दिले. असे असताना त्यांनीही पक्षाशी गद्दारी केली आहे, त्यांना धडा शिकविला जाईल,
असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.





























































