अदानी इलेक्ट्रिसिटीमधील कंत्राटी कामगारांना कायम करा, लोकाधिकार समितीच्या कार्यकर्ता शिबिरात ठराव

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित अदानी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेना आणि स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्यकर्ता शिबीर नुकतेच सांताक्रुझ येथे संपन्न झाले. पंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करण्यात यावे आणि व्यवस्थापनाने कामगारांचा 22 महिने रखडलेला करारनामा त्वरित कामगार संघटनेशी चर्चा करून पगारवाढ करावी, असे दोन महत्त्वपूर्ण ठराव यावेळी संमत झाले. शिबिरात 386 कामगार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले, अदानी समूह हा देशातील विद्युत क्षेत्रातील अग्रगण्य समूह आहे. त्यांनी आपल्या कामगारांना सुविधांपासून वंचित ठेवता कामा नये. व्यवस्थापनाने जातीने लक्ष घालून कामगारांच्या पगारवाढीचा करारनामा त्वरित करायला हवा. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत म्हणाले, पंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले पाहिजे. व्यवस्थापनाने कामगारांच्या हिताशी खेळ न करता कामगारांच्या आर्थिक उन्नतीकरिता पगारवाढीचा करार त्वरित केला पाहिजे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी व्यवस्थापनाने कामगारांना दहशतीच्या वातावरणात न ठेवता कामगारांचे ज्वलंत प्रश्न त्वरित सोडविले पाहिजेत. कामगार आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना नोकरभरतीत प्राधान्य दिले पाहिजे. व्यवस्थापनाला संघटनेशी चर्चा करायला वेळ नसेल तर कामगारांना घेऊन अहमदाबाद येथील पंपनीच्या मुख्यालयावर धडकणार असल्याचा इशारा दिला.

यावेळी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप बोरकर, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे संघटन चिटणीस उमेश नाईक, विद्युत कामगार सेनेचे सरचिटणीस नरेंद्र पालांडे, माझगाव डॉकचे कामगार नेते दीपक यादव, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उल्हास बिलये, शिबीरप्रमुख संतोष दळी, उत्तम जाधव, मुकेश भाटकर आदी उपस्थित होते.