
सामना प्रतिनिधी । मनमाड
येथील मंडल कार्यालयातून गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून रहिवासी दाखला दिला जात होता. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून हा दाखला देणे बंद झालेले आहे. शहरातच रहिवासी दाखला मिळावा अशी मागणी नांदगाव तालुका शिवसेनेतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
रहिवासी दाखला मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी व पालकांची कामे खोळंबली आहेत. रहिवासी दाखला हा प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचा असून यावर लवकरात लवकर मार्ग निघावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, नांदगाव तालुका संघटक संजय कटारिया, विधानसभा संघटक संतोष जगताप, भा.वि. सेना प्रवीण सूर्यवंशी, शिवसेना उपप्रमुख खालिद शेख आदींनी केली.
दादा भुसे यांनी तत्काळ येवल्याचे प्रांत अधिकारी भीमराज दराडे यांच्याशी संपर्क साधला व रहिवासी दाखला मनमाड शहरातच मिळावा यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. येत्या १५ दिवसांत हे दाखले मनमाड येथून मिळतील अशी व्यवस्था करण्याचे सुतोवाच प्रांत दराडे यांनी केले.






























































