
बीडमध्ये शिवसेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. गुढी पाडवा आणि रमजान महिना डोळ्यासमोर ठेवून अमर नाईकवाडे, फारूक पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन शहरातील उपाययोजनांबाबत बैठक घेतली. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरात स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे, तर दोन दिवसांत 500 ठिकाणी पथदिवे बसवली जाणार आहेत.
बीड नगर पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगरसेवक अमर नाईकवाडे आणि फारूक पटेल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यासोबत बैठक घेतली. दोन दिवसांवर आलेला गुढी पाडवा आणि रमजान महिना या पार्श्वभूमीवर शहरातील मूलभूत सुविधांबाबत चर्चा झाली. या आठवड्यातच लेबर टेंडर प्रक्रिया होऊन 10 एप्रिलपर्यंत पावसाळ्यापूर्वी शहरातील स्वच्छतेची कामे सुरू होणार आहेत. स्वच्छता मोहिम युद्ध पातळीवर राबवली जाणार आहे, तर दोनच दिवसांमध्ये शहरातील 500 विद्युत खांबावर एलईडी पथदिवे लावणार आहेत. उर्वरित 500 पथदिवे पुढील टप्प्यात बसवले जाणार आहेत. मोकाट जनावरांचा बंदोबस्त कोंडवाड्यामध्ये केला जाणार आहे. नळजोडणीची कामे वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत. या बैठकीला नगरसेवक शेख इक्बाल, मुखीद लाला, भैय्यासाहेब मोरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.



























































