शिवसेनेने करून दाखवले… मुंबईकरांना अभिमानाने सांगा! आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशनमधून मांडला विकासकामांचा लेखाजोखा

मुंबई महानगरपालिकेमध्ये सलग 25 वर्षे सत्तेत राहिलेल्या शिवसेनेने मुंबईकरांना शुद्ध पाणी, नागरी सुविधा, कचरा विघटन आणि वीजनिर्मिती, डिजिटल शिक्षण, 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट, कोस्टल रोड आणि ‘बेस्ट’च्या माध्यमातून दर्जेदार स्वस्त वाहतूक सुविधा देतानाच नियोजनबद्ध आर्थिक शिस्तीमुळे 1997 मध्ये 650 कोटी रुपये तुटीत असणाऱ्या पालिकेच्या ठेवी 92 हजार कोटींवर नेल्या. शिवसेनेने हे करून दाखवले आहे हे मुंबईकरांना अभिमानाने सांगा, असे आवाहन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

वरळीमध्ये आयोजित मेळाव्यात ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया’ या आशयाखाली आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांचे प्रेझेंटेशनच सादर केले. तब्बल एक तास चाललेल्या या प्रेझेंटेशनला शिवसैनिकांनी टाळय़ांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. सर्वात पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोविड काळात केलेल्या कामाचे त्यांनी सादरीकरण केले. एनएससीआय डोममध्ये सुरू केलेले जम्बो कोविड सेंटर देशातील पहिले फिल्ड हॉस्पिटल ठरल्याचे ते म्हणाले. या ठिकाणी हजारो कोविड रुग्णांना जीवदान मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईमध्ये कोविड रोखण्यासाठी झालेल्या कामाचे जगात कौतुक झाले. धारावी मॉडेलचा जागतिक आरोग्य संघटनेनेही गौरव केला. यावेळी कोणालाही भेटणे, बैठका घेणे शक्य नसल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद आणि ऑनलाईन बैठका घेतल्या. यामुळे हजारो जीव वाचले. याचे अनुकरण नंतर सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केल्याचेही ते म्हणाले. याकेळी मान्यकरांच्या हस्ते अखिल चित्रे लिखित शिकसेनेच्या काळातील ‘तेजपर्क ते मिंधे-भाजप सरकारच्या काळातील अंधारयुग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, शिवसेना नेते–खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते-आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना नेते- आमदार सुनील प्रभू, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे,  आमदार अजय चौधरी, महेश सावंत, बाळा नर, मनोज जामसुतकर, सुनील शिंदे, शिवसेना सचिव सुधीर साळवी, उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, शीतल शेठ-देवरुखकर, माजी महापौर मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, उपनेते अशोक धात्रक, माजी आमदार रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, संतोष शिंदे, सुदेश पाटेकर, सुरेश पाटील, माजी महापौर हेमांगी वरळीकर, ऍड. सुहास वाडेकर, सुप्रदा फातर्पेकर यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

मिंध्यांच्या गद्दारीमुळे विकास थांबला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोडचे काम सुरू झाले. यावेळी दहिसरपर्यंत हा कोस्टल रोड करण्याचे ठरले होते. मात्र 2022 मध्ये मिंध्यांच्या गद्दारीमुळे महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर कोस्टल रोडचे पालिकेने फक्त वरळीपर्यंत काम करावे, पुढचे काम एमएसआरडीसी करेल, असा निर्णय घेण्यात आला.

गेल्या चार वर्षांत कोस्टल रोडचे कोणतेही काम झाले नाही. मुंबईची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प नियोजित करण्यात आला होता. यासाठी एकही झाड न तोडता मुंबईकरांना दररोज 400 दशलक्ष लिटर पाणी मिळणार होते. पाण्याची वाढती गरज भागणार होती, मात्र या मिंध्यांच्या गद्दारीमुळे मुंबईची विकासकामे ठप्प पडली.

अशा झाल्या सुविधा

पालिकेच्या शाळा डिजिटल केल्याने विद्यार्थी संख्या साडेतीन लाखांवर गेली. सीबीएसई, आयबी, केंब्रिजसारखे बोर्डाचे शिक्षण सुरू केल्याने पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागू लागल्या. प्रवेशासाठी लॉटरी काढावी लागली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून शिक्षण सुरू केल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाले.

मुंबईची चार मोठय़ा प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आणि अद्ययावत आरोग्य सुविधा 90 टक्के मोफत व इतर अल्प दरात मिळत आहेत.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात 2017 मध्ये पेंग्विन आणल्यानंतर वाघ, बिबटे, हायना, अस्वल, शेकडो पक्षी, साप, कासव आणल्यामुळे महसूल कोटय़वधींनी वाढला.

बेस्टचे एसी बसचे तिकीटही पाच रुपये केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा. प्रदूषण टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमात दहा हजार इलेक्ट्रिक बस आणण्याचे ध्येय पूर्ण करणार आहे.

बीडीडी चाळींचा पुनर्विकास

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत 1995 पासून चर्चा होत होती. 2017 मध्ये उद्धव ठाकरे दौऱ्यावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजनाचा नारळही फोडला, मात्र पुढे कोणतेही काम झाले नाही. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरू झालेल्या वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती मिळाली. 160 चौरस फुटांच्या घरात राहणाऱयांना 500 चौरस फुटांची सुसज्ज घरे मिळाली आहे. मात्र मिंधे-भाजप सरकारच्या काळात बीडीडी चाळींचा पुनर्विकास रखडला आहे.

फक्त साडेतीन रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाणी

पालिका मुंबईकरांना केवळ साडेतीन रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाणी देते. हे पाणी पुरवण्यासाठी पालिकेला प्रत्यक्षात साडेअकरा रुपये खर्च करावा लागतो. विशेष म्हणजे हे पाणी नामांकित बाटलीबंद पाण्यापेक्षा शुद्ध असते, असे ते म्हणाले. शिवसेनेच्याच सत्ताकाळात विक्रमी वेळेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण बांधण्यात आले. शिवाय वास्तव्याचा कोणताही पुरावा न पाहता सर्वांसाठी पाणी योजना राबवण्यात आली.

 

महत्त्वाचे प्रकल्प

स्वच्छ सुंदर मुंबईसाठी कचरा विल्हेवाटीसाठी राबवलेल्या उपाययोजनांमुळे दररोज दहा हजार मेट्रिक टन जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण सहा हजार मेट्रिक टनांवर आले.

गिरगावचा नेचर वॉक, ह्युविंग गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेल्फी पॉइंट, पालिका मुख्यालयाची हेरिटेज सफर असे प्रकल्प राबवण्यात आले.

गोराईत 800 एकर जागेत कांदळवन सफर प्रकल्प पूर्ण आहे. मात्र या सरकारकडून त्याचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. प्रस्तावित सांडपाणी प्रकल्पही या सरकारने रखडवला.

पूरमुक्त मुंबईसाठी देशात पहिल्यांदा अंडरग्राऊंट टँक प्रकल्प राबवण्यात आले. त्यामुळे हिंदमाता, मीलन सबवेसारख्या ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रमाण घटले.

धारावीसारख्या ठिकाणी 111 सीटचे टॉयलेट सुरू केले. या ठिकाणी महिलांना कपडे धुण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे महिलांच्या कामाचा बोजा कमी झाला.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात मरीन ड्राइव्ह इथे मराठी रंगभूमी दालनाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र मिंधे सरकारने हे काम रद्द केले.