डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, शिवसेनेची पोलीस महासंचालकांकडे मागणी

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची चौकशी निष्पक्षपणे, स्वतंत्र आणि उच्चस्तरीय तपास यंत्रणेकडून करावी, अशी मागणी शिवसेनेने केली. यासंदर्भातील निवेदन शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

डॉ. संपदा मुंडे यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदने याच्यावर बलात्कार केल्याचा तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे गंभीर आरोप केलेले आहेत. महिलांविरोधातील गुन्हे रोखण्याची आणि महिलांना कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी असणाऱ्या  पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवरच असे आरोप होणे ही कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने अतिशय ंिचंताजनक बाब आहे. या प्रकरणातील आरोपींना संरक्षण देण्यासाठी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, त्यांचे स्वीय्य सहाय्यक राजेंद्र शिंदे, रोहित नागतिळे यांनी दबाव टाकला असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. पीडितेच्या कुटुंबानेही राजकीय हस्तक्षेप व दडपशाहीबाबत गंभीर आरोप करत त्वरित न्यायाची अपेक्षा केली आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे कोणत्याही महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर अशी परिस्थिती येऊ नये यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणा करावी, तसे आदेश संबंधितांना द्यावेत, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले. यावेळी शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, शीतल देवरुखकर-शेठ, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव आणि स्नेहा आंबेकर, महाराष्ट्र समन्वयक रंजना नेवाळकर, विभाग संघटिका युगंधरा साळेकर उपस्थित होत्या.