
जोगेश्वरी पूर्व मजासवाडी येथे श्रद्धा लाईफस्पेसच्या माध्यमातून इमारतीचे बांधकाम सुरू असताना वीट डोक्यात पडून संस्पृती कोटीयन 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज कामगार आयुक्तांची भेट घेऊन भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जोगेश्वरी पूर्वमधील सर्व प्रकल्प स्थळांची पाहणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जोगेश्वरी पूर्व विधानसभेत अनेक ठिकाणी खासगी विकासक, मुंबई महापालिका, म्हाडा, एसआरए आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून बहुमजली इमारतींचे काम सुरू आहे. बांधकाम करताना विकासकाकडून सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे बांधकाम साईटवरून वारंवार बांधकाम साहित्य पडून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. असे प्रकार घडून नाहक बळी जाऊ नयेत यासाठी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुमोड यांची भेट घेऊन कामगार व नागरिकांच्या सुरक्षिततेची दक्षता घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रत्यक्षस्थळी पाहणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी हीदेखील आग्रही मागणी कामगार आयुक्त यांच्याकडे केली. यावेळी विजय पाचरेकर व शैलेश बांदेलकर उपस्थित होते.