
पुण्यातल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात त्यांच्या जाऊ मयुरी हगवणे यांनी महिला आयोगाकडे घरगुती हिंसाचाराच्या अनेक तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या तसेच बिल्डर निलेश चव्हाणने केलेल्या गैरवर्तनाबाबतही महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पक्षपाती भूमिका घेतली. चाकणकर या फक्त पद मिरवत असून प्रत्यक्षात त्या महिलांना न्याय देताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांनी ताबडतोब पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत शिवसेना विभाग क्रमांक 11 च्या वतीने लालबागमध्ये जाहीर निषेध करण्यात आला.
पुण्यात घडलेल्या संतापजनक हुंडाबळी प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रूपाली चाकणकर यांच्या अकार्यक्षम आणि पक्षपाती वागणुकीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून सडकून टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आमदार अजय चौधरी यांच्या सूचनेने लालबागमध्ये भारतमाता सिनेमासमोर आज संध्याकाळी शिवसेनेने निषेध आंदोलन केले. आंदोलनात शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, राम सावंत, वरळी विधानसभा संघटक निरंजन नलावडे, विधानसभा समन्वयक बबन गावकर, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, जयसिंह भोसले, विजय इंदुलकर, जीवबा केसरकर, दीपक बागवे, विजय भणगे, रमेश रावल यांच्यासह शिवडी विधानसभेतील सर्व महिला आघाडी, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते.