सामना प्रतिनिधी । मुंबई
उद्याने, शाळा, रुग्णालय यांच्यासाठी आरक्षित असलेले भूखंड खरेदी केल्यानंतर नक्की किती काळात विकसित करणार त्याची डेडलाइन सांगा, त्याचा उल्लेख करून आणलेले खरेदी सूचनेचे प्रस्तावच मंजूर केले जातील, असा स्पष्ट इशारा बुधवारी शिवसेनेने पालिका प्रशासनाला दिला. बॉम्बे रिअल इस्टेट या एकाच मालकाचे भूखंड पालिकेच्या गळ्यात मारणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे साटेलोटे शिवसेनेने उघड केले.
पोयसर आणि गोरेगाव येथे शाळा, उद्यान आणि रस्त्यासाठी आरक्षित असलेले सहा भूखंड खरेदी करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने सुधार समितीमध्ये दफ्तरी दाखल केले. यावरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. हे भूखंड बिल्डरच्या घशात गेल्याची बोंब विरोधकांनी उठवली आहेबुधवारी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव आणि समाजवादीचे रईस शेख यांनी स्थायी समितीमध्ये या विषयावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कामकाज सुरूच ठेवले. सभा संपल्यावर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. याप्रकरणी पालिका आयुक्तांना याप्रकरणी पत्र लिहिले असून आतापर्यंत किती भूखंडांचा विकास केला त्याची माहिती देण्याची व यापुढे प्रस्तावात प्रत्येक भूखंडाच्या विकासाचा लेखाजोखा आणि डेडलाइन देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली.
अधिकाऱ्यांचे साटेलोटे?
भूखंड खरेदीचे प्रस्ताव फेटाळल्याप्रकरणी विरोधकांनी राजकारण सुरू केलेले असताना शिवसेनेने मात्र या प्रकरणाची दुसरी बाजू उजेडात आणली आहे. बॉम्बे रिअल इस्टेट या एकाच संस्थेचे 40 हजार चौ. मीटरचे आणि चार हजार कोटी किमतीचे पाच भूखंड एकाच बैठकीत आणले गेले. यापूर्वी याच संस्थेचे 14 भूखंड पालिकेने खरेदी केले आहेत. त्याचा विकास झाला आहे की नाही याची माहिती प्रशासनाने आधी द्यावी अशी मागणी यशवंत जाधव यांनी केली. अतिक्रमण झालेले भूखंड पालिकेच्या गळय़ात मारणारे मालक आणि अधिकारी यांचे साटेलोटे असल्याचा संशय जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
एक इंचही जमीन सोडणार नाही
मोकळे भूखंड, नागरी सुविधांसाठी आरक्षित असलेले भूखंड ताब्यात घेतलेच पाहिजेच हीच शिवसेनेची भूमिका आहे. त्यानुसार एक इंच जमीनही बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही, परंतु ज्या जागांवर आधीच अतिक्रमण आहे अशा एका मालकाच्या जागा पालिकेच्या गळय़ात मारून जनतेचा पैसा लुटण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते होऊ देणार नाही. – यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

























































