शिवसैनिकांनी संघटनात्मक पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सर्व माजी आमदार यापुढे पुन्हा कसे निवडून येतील, यासाठी शिवसैनिकांनी तयारीला लागा. संघटनात्मक पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱयांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, चार राज्यांत सत्ता मिळाल्यानंतर भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याची स्वप्नं पडू लागली आहेत. मात्र, शिवसैनिक त्यांचे मनसुबे उधळायला तयार असून, महाराष्ट्रात पुन्हा त्यांना प्रवेश करू देणार नाही.

जिह्यातील सर्व शिवसैनिकांसह पदाधिकाऱयांनी शिवसेनावाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत पुन्हा एकदा शिवसेनेने केलेले कार्य घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.

मेळाव्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, उल्हास पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.