शेतकऱयांना त्वरित नुकसान भरपाई द्या; ट्रक्टर, बैलगाडय़ांसह शिवसेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अवकाळी आणि गारपीटीच्या नुकसानीने संकटात सापडलेल्या नाशिक जिह्यातील शेतकऱयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, संपूर्ण कर्जमुक्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रक्टर व बैलगाडय़ांसह भव्य मोर्चा काढला.

नाशिक, निफाड, दिंडोरी, येवला, चांदवड, देवळा, सटाणा, इगतपुरी, सिन्नर, नांदगाव, कळवण, सुरगाणा, पेठ आदी संपूर्ण जिह्याला गारपीट व अवकाळी पावसाने जोरदार फटका दिला. द्राक्ष, कांदा, गहू, ऊस, भात, टोमॅटो, भाजीपाल्यासह सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱयांना त्वरित दिलासा मिळण्यासाठी शासनाने तातडीची मदत करावी, यासाठी सोमवारी शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती कार्यालयापासून मोर्चा काढला. बैलगाडय़ा आणि ट्रक्टर घेवून जिह्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शालिमार, मेनरोड, रेडक्रॉस सिग्नल, एम जी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघाला. सहभागी झालेले शेतकरी, महिला वर्ग व शिवसैनिकांच्या हातात शेतीमाल होता.

‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष यावेळी सुरू होता. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, पीकविम्याचे पैसे मिळालेच पाहिजे, शेतमालाला हमीभाव व कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे आदी मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, जनावरांसाठी चारा-पाण्याची उपाययोजना करावी, जनावरांना खुंटय़ावर चारा उपलब्ध करून द्यावा, पीकविम्यातील जाचक निकष रद्द करावे, पीकविम्याची सरसकट रक्कम मिळावी, खरीप व रब्बी हंगामातील पिकांना सरसकट विम्याची रक्कम मिळावी, अटी-शर्थी न लावता शेतकऱयांना कर्जमुक्ती द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गणेश धात्रक, माजी आमदार अनिल कदम, माजी आमदार निर्मला गावीत, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदींनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना शेतकरी नुकसानीची माहिती देत त्वरित सहाय्य करण्याची विनंती केली.

यावेळी संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख नितीन आहेर, कुणाल दराडे, माजी आमदार योगेश घोलप, विनायक पांडे, विलास शिंदे, जगन आगळे, निवृत्ती जाधव, देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, बाळासाहेब कोकणे, देवा जाधव, भैय्या मनियार, संतोष साळवे, दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, राहुल दराडे, सुधीर कराड, मोहन गांगुर्डे, अंबादास जाधव आदी हजर होते.