
खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चेबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी एवढय़ा मोठय़ा हिंदुस्थानात केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी बोचरी टीका करतानाच बुडत्याला काडीचा आधार, असा टोला लगावला.
सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले, नारायण राणे यांनी एकदा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारून घेतलं.
राणेंच्या कंगालपणामुळे प्रस्ताव रखडला
राणेंच्या हॉस्पिटलला शिवसेनेने कदापिही खो घालण्याचा प्रयत्न केला नाही, उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. जो प्रस्ताव रखडला होता तो राणेंच्या कंगालपणामुळे, असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
शहा-राणेंची युती लाईफ टाईम टिको
नारायण राणे आणि अमित शहा यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठtरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्या पाठी ईडी लावायची, असेही ते म्हणाले.

































































