शून्यातून विश्व निर्माण करणारे मनोहर जोशी लढवय्ये, कडवट शिवसैनिक होते! – संजय राऊत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, शिवसेनेसाठी लढणारे एक आदर्श व्यक्तिमत्व गमावल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मनोहर जोशी यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशी यांना प्रेमाने पंत म्हणायचे. शून्यातून विश्व निर्माण करणारे मनोहर जोशी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, शिवसेनेसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना आम्हाला ही दु:खद बातमी समजली. हा दौरा थांबवून आम्ही मुंबईकडे रवाना होत आहोत. दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघणार असून आम्ही त्यात सहभागी होऊ, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, मनोहर जोशी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची झुंज सुरू होती. ते झुंजार, लढवय्ये होते. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर होते. मुंबईत सीमाप्रश्नी आंदोलन झाले. त्यात 69 हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली. तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी होते. ते शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले.

शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सर्व संसदीय पदांवर काम केले. नगरसेवक, मुंबईचे महापौर, विधानपरिषद आणि विधानसभेचे आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मुख्यमंत्री, त्यानंतर ते लोकसभेत गेले, केंद्रीय मंत्री झाले, लोकसभेचे अध्यक्ष झाले. त्यांचा हा प्रवास शिवसेनेच्या माध्यमातून झाला आणि ते सदैव शिवसेनेचे ऋणी राहिले, असेही राऊत म्हणाले.

मनोहर जोशी उद्योजकही होते आणि मराठी माणसाने उद्योग, व्यवसाय कसा करावे हे त्यांच्याकडून शिकावे. आज ते आपल्यात नाहीत. त्यांना फक्त मराठी माणूसच नाही तर संपूर्ण देशातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम आदर्श होते. ते हाडाचे शिक्षक होते. त्यांना सगळे हेडमास्तर म्हणायचे. पक्षपात न करता संसद कशी चालवावी हे त्यांनी दाखवून दिले. हजारो शिवसैनिकांसाठी ते आदर्श होते, असेही राऊत त्यांच्या आठवणीत म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. तेव्हा एक ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून टीका झाली. महाराष्ट्राला प्रथमच एक ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाला अशी टीका झाली. पण बाळासाहेबांनी कधीही कुणाची जात पाहिली नाही. त्यांचे कर्तुत्व आणि कर्तबगारी पाहिली. बाळासाहेबांची विकासासंदर्भाती जी स्वप्न होती ती मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पूर्ण झाली, असेही राऊत म्हणाले.