वाडिया रुग्णालय बंद पाडण्याचा डाव हाणून पाडू!

798

परळमधील लहान मुलांच्या वाडिया रुग्णालयात विविध आजारांवर माफक दरात उपचार केले जातात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या रुग्णालयाचा 96 कोटींचा निधी पालिका प्रशासनाने रोखून ठेवला आहे. निधी रोखण्यामागे वाडिया रुग्णालय बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी केला. मात्र, रुग्णालय बंद पडण्याचा डाव हाणून पाडू असा इशाराही यावेळी देण्यात आला.

वाडिया रुग्णालय मुंबईसह आशिया खंडात लहान मुलांवर माफक दरात उपचारासाठी प्रसिद्ध आहे. जन्मजात विविध आजार, रोग यांनी त्रस्त असलेल्या मुलांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही या रुग्णालयात होतात. असे असताना पालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांचा 96 कोटींचा मदतनिधी रोखून ठेवला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांचे पगार रखडले आहेत. नवीन रुग्णांना प्रवेश दिले जात नाहीत. मिळणाऱया देणगीवर हे रुग्णालय कसेबसे खर्च भागवत आहे. अशाने रुग्णालय बंद पडेल अशी भीती स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा मांडून व्यक्त केली. वाडियाच्या विश्वस्त मंडळावर पालिकेचे 4 नगरसेवक आहेत, मात्र पालिका प्रशासनाला पालिकेचे अधिकारी मंडळावर विश्वस्त म्हणून घ्यायचे आहेत. त्यासाठीच हा निधी रोखून धरला आहे असा गंभीर आरोप रवी राजा यांनी केला. चांगले रुग्णालय बंद होता कामा नये. पालिका प्रशासनाचा हा आडमुठेपणा आहे असा आरोप राजेश्री शिरवडकर यांनी केला. काहीही झाले तरी हे रुग्णालय टिकले पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन लवकरात लवकर हा निधी द्यावा अशी आग्रही मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत, राजुल पटेल आणि सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली.

पुढील बैठकीत अहवाल सादर करा!  

वाडिया रुग्णालयाचा निधी पालिका प्रशासनाने रोखल्याबाबत नगरसेवकांनी अनुकूल आणि प्रतिकूल अशी दोन्ही मते मांडली आहेत. वाडियातील काही डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात, फी घेतात, असेही आरोप करण्यात आले आहेत. त्याचीही संपूर्ण शहानिशा करून पुढील बैठकीत याची माहिती स्थायी समितीसमोर लिखित स्वरूपात सादर करावी, असे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या