युतीच्या बातम्या ते सोडतायंत, आम्ही नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या दाव्यांची हवा काढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । महाड

‘आज युतीच्या चर्चा सुरू असल्याच्या बातम्या ते सोडताहेत. आम्ही नाही’, असे स्पष्ट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या दाव्यांची हवा काढून घेतली. ‘आता निवडणुका जवळ आल्यामुळे भ्रमाचे भोपळे, गाजरं वाटले जातील’, असा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.

महाड येथील रावसाहेब भिल्लारे मैदानावर आज दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली. ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी मार्गदर्शन केलं. तसचं सरकारवर तुफान टीका केली.

म्हणून शिवसेना सत्तेतून बाहेर पडली नाही

‘मदांध हत्तीवरती अंकुश ठेवण्याचे काम माहुत करतो, तसं सत्तांध हत्तीवरती मी शिवसेनेचा अंकुश मारणारच. आणि आम्ही सत्तेतून बाहेर बडत नाही कारण आम्ही उतरलो तर हा सत्तांध हत्ती आणखी माजेल’, अशा खणखणीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करत सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, आज सत्तेत असलेले 50 वर्ष आमची सत्ता असेल असे बोलताहेत. पण पाच वर्ष सत्ता दिली आहे. त्याचा लेखाजोखा आधी जनतेसमोर मांडा, अशा सणसणीत शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

हिवाळा सुरू होण्याआधीच महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. हे दिवस आणखी पुढे गेले की काय परिस्थिती येईल माहित नाही. पण मग हे सरकार ढोल वाजवत होतं की, आम्ही एवढे दुष्काळ तालुके दुष्काळमुक्त केले. ते कुठे गेले?, असा सवाल त्यांनी करत सत्ताधारी भाजपची पोलखोल केली.

मूलभूत प्रश्नांच्या मुळाशी न जाता केवळ वरवरच्या गोष्टी केल्याचे हे परिणाम असल्याचे ते म्हणाले. पहिली दोन-तीन वर्ष तुमची बरी गेली ते काही तुमचं कर्तुत्व नव्हंत तर वरुणराजाचं कर्तुत्व, तो बरसला नसता काय झालं असतं, असेही ते भाजपला म्हणाले. आताही सरकारने दुष्काळ जाहीर केला, पण कामं कधी सुरू करणार, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

थापांचा पाऊस पडतोय

मराठावाड्यात दुष्काळग्रस्त भागात फिरताना मी लोकांना म्हणयाचो दुष्काळ कुठे आहे? लोकांना वाटायचं हे काय बोलताय? मग मी त्यांना सांगायचो पाण्याचा दुष्काळ आहे पण थापांचा दुष्काळ कुठे आहे, थापांचा तर पाऊस पडतोय; असं उद्धव ठाकरे म्हणताच हशा पिकला.