
वर्षानुवर्षे चाळीतील दहा बाय दहाच्या घरात राहून आता कुठे पुनर्विकासाची स्वप्ने बघणाऱया चाळी तसेच इमारतींतील भाडेकरूंवर अन्याय करणाऱया आदर्श भाडेकरू कायद्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली. यामुळे बाजारभावानुसार भाडे आकारण्याचा आणि ते थकल्यास भाडेकरूला थेट घराबाहेर काढण्याचा अधिकार मालकाला मिळाला आहे. हजारो कुटुंबांवर अन्याय करणारा हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरली. दहिसरपासून मुलुंडपर्यंतच्या शिवसैनिकांनी ठिकठिकाणी निदर्शने करीत, जोरदार घोषणा देत या कायद्याचा तीव्र निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने आदर्श भाडेकरू कायदा लागू केला असून त्याची अंमलबजावणी आता राज्य सरकारला करावी लागणार आहे. त्यामुळे हा कायदाच रद्द करावा ही शिवसेनेची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारच्या या अन्यायकारक कायद्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले. दहिसरपासून ते मुलुंडपर्यंत ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात आली. बोरिवलीत विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वात, घाटकोपरमध्ये विभागप्रमुख राजेंद्र राऊत, मुलुंडमध्ये विभागप्रमुख रमेश कोरगावकर, कुर्ला पश्चिम येथे विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस, आमदार मंगेश कुडाळकर, दक्षिण मुंबईत शिवसेना खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, मीनाताई कांबळी, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, मंगेश सातमकर, वरळीत आशिष चेंबूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी तीव्र निदर्शने करतानाच, कायद्याविरोधात फलक झळकावण्यात आले. विक्रोळी येथे आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या कायद्याचा निषेध! निषेध!! निषेध!!!, अन्याकारक कायदा रद्द करा अशा जोरदार घोषणा, काळी फीत लावत, सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळत कायद्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
खासदार शेवाळे यांचे पंतप्रधानांना पत्र
मुंबईसह देशभरातील भाडेकरूंसाठी अन्यायकारक असणारा नवा ‘आदर्श भाडेकरू कायदा’ त्वरित रद्द करावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या कायद्यामुळे मुंबईतील हजारो भाडेकरूंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याविरोधात लोकसभेत आवाज उठवून केंद्र सरकारला हा कायदा मागे घेण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या अन्यायकारक कायद्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक शुक्रवारी रस्त्यावर उतरले. दहिसरपासून ते मुलुंडपर्यंत ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात आली. दादरमध्ये विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर, तर कुर्ला येथे विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.






























































